लक्ष्मण मोरे पुणे : पुणे शहर 'मोस्ट लिव्हेबल सिटी'चे बिरुद चिकटलेल्या पुण्यात दरवर्षी कोट्यवधी रुपये खाणाऱ्या खड्डयांनी यंदा मात्र पालिकेला उसंत दिली आहे. गेल्यावर्षी शहरातील खड्डे बुजविण्यावर तब्बल ३ कोटी २० लाख रुपये खर्च झाला होता. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने रस्त्यांवरील खड्डेही कमी झाले आहेत. चालू वर्षात आतापर्यंत १० लाख रुपयांचा खर्च खड्डयांवर झाला आहे. गेल्यावर्षीचा खर्च पाहता शहरातील खड्डे महिन्याकाठी दोन कोटी रुपये 'खात' होते. रस्त्यांच्या 'रिसरफेसिंग' वर जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये तब्बल २२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर या पैशातून कामे झाली होती. रस्त्यांवरील खड्यांवरुन पालिकेच्या मुख्य सभेमध्येही पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी ठरले होते. शहरात मेट्रो तसेच अन्य विकास कामांमुळे होत असलेल्या त्रासाला नागरिक कंटाळलेले आहेत. आजही शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्त्यांची खोदाई सुरू असून पालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाअभावी रस्ते वारंवार खोदावे लागत आहेत.
कूर्मगतीने चालणाऱ्या या कामांमुळे पुणेकरांना होणारा त्रास नेहमीचाच आहे. खड्डे चुकवित वाहनचालकांना तर कसरत करतच वाहने चालवावी लागतात. रस्त्यांच्या कामांच्या सुमार दर्जामुळे वारंवार रस्ते उखडणे, खड्डे पडणे हे नित्याचेच झालेले आहे. या कामांकरिता वारंवार खर्चही करावा लागतो. यासोबतच रस्त्याचे काम झाल्यानंतर ड्रेनेज, जलवाहिनी, विद्युतवाहिनी अथवा एमएनजीएलच्या गॅसवाहिनीसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागतो. पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्ती, रिसर्फेसिंग, खड्डे बुजविणे आदी कामांकरिता गेल्या वर्षी २२ कोटी खर्च रुपये केले होते. यातील ३ कोटी २० लाख रुपये फक्त खड्डयांवर खर्च झाले होते. यंदा लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती.
त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि खासगी कार्यालये बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे रस्त्यावर वाहने येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात खड्डयांचे प्रमाण एकदम कमी झाले असून तीन महिन्यात अवघे दहा लाख रुपयेच या कामावर खर्च झाल्याचे पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनचा असाही फायदा महापालिकेला मिळाला असून पालिकेचे लाखो रुपये वाचले आहेत. ---------- गेल्या वर्षी रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी ३ कोटी २० लाखांचा खर्च झाला होता. यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील फक्त दहा लाख रुपये खर्च झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर यंदा खड्डेच नसल्याने पालिकेचे पैसे वाचले आहेत. कोरोनाच्या काळात पालिका प्रशासन विविध विभागांच्या आणि स यादीच्या बजेटला कात्री लावत असताना अशाप्रकारे वाचलेले पैसे पालिकेला उपयोगी पडणार आहेत.