पुणे - राज्यातील महिला अत्याचारांवरील घटनामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दीक चिखलफेक करत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना थोंबाड रंगवू, अशा शब्दात इशारा दिला होता. आता, भाजप आमदार सुनील कांबळेंवरही चाकणकर यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचेआमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन, रुपाली चाकणकर यांनी भाजपा आणि आमदार सुनिल कांबळेवर निशाणा साधला आहे. तसेच, सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरुन सुनिल कांबळे यांचा निषेध नोंदवला आहे.
'आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे. 'भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार', असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर बोचरी टीका केलीय. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलंय.
काय आहे प्रकरण
आमदार सुनिल कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुली दिली. ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबधीत महिला अधिकाऱ्यानी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ केली.