धनाजी कांबळे
पुणे : उसतोडणीस पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या येतात आणि हंगाम संपताच आपल्या गावी जातात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील बोरजाईनगर गंजीखाना येथे ६०-६५ लहानमोठी बायाबापडी राहत आहेत. यात दोन महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. असेच चित्र सर्व कारखान्यांच्या भागांत आहे. याबाबत साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.गावाच्या बाहेर वस्ती असल्याने परिसरातील लोक मदतीसाठी पुढे येतील, ही केवळ भाबडी आशा ठरत आहे. पलूसमध्ये उतरलेली ही टोळी. दीड महिन्यांपूर्वीच या पालावर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून ते या भागात आहेत. नगरपरिषदेने दिलेले धान्यही आता संपलं आहे.‘दोन दिवसांपासनं आभाळ भरून येतयं, कुठं राहावं आणि काय करावं, डोकं काम करेना,’ असे पन्नाशीत पोचलेले बाळू वीर सांगत होते. मुरली शिदे, महादेव मल्हारी, श्रीहरी, दशरथ, जितेंद्र, रामहरी वीर, सिद्धार्थ सुरवसे, राजेंद्र खेमाडे, दीपक बनसोडे, प्रशांत भडगीळे, अभिमान केदार, शुभम कोरडे आदी तीन टोळयांचे लोक बोरजाईनगर, गंजिखाना या भागात २४ झोपड्यांमध्ये राहत आहेत.६६४ रिलिफ कॅम्पपुणे विभागात एकूण ६६४ रिलीफ कॅम्पमध्ये ६० हजार ७९३ स्थलांतरीत मजूर आणि १ लाख १९ हजार २७३ मजुरांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. पण अनेक कामगार व बेघरांना अशी मदत तत्काळ पोहचवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धनाजी गुरव, पर्यावरण मित्र शरद झरे, बाळासाहेब मोटे यांनी केली आहे.उसतोडणी कामगारांना मदतीची गरज असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करणार आहोत.- राजेंद्र पोळ, तहसीलदार