लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे फेकून दिला आहे. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा भरण्याचा आणि मार्केटपर्यंत पोहोचविण्याचाच खर्च निघत नाही. मग करायचे काय, असा सवाल उत्पादक करीत आहेत. सलग दोन वर्षे कांद्याची ही अशी तऱ्हा असल्याने शेतीच करायची की नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे.करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी या गावांत सध्या ही परिस्थिती आहे. कांदा पिकविणेच मुळात फार खर्चिक आहे. या पिकासाठी पूर्वमशागत, रान तयार करणे, बियाणे - रोपे, लागवड, खुरपणी, तणनाशक, कीटकनाशक, खते, वीजबिल, पाण्याच्या पाळ्या, काढणी, बारदाना, वाहतूक, अडत, हमाली इ. कामासाठी एक एकर कांदा पिकविण्यासाठी किमान ५० ते ६० हजारांचा खर्च येतो.आज चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रतिकिलोग्रॅम चार ते सात रुपये बाजारभाव आहे. एवढ्या कमी भावामध्ये उत्पादन खर्चच काय साधी मजुरीही भागत नाही. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजाने छातीवर दगड ठेवून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी उभे कांदापिक ट्रॅक्टरने नांगरत आहेत. कोणी पेटवून देतोय, तर कोणी त्यावर शेळ्या, मेंढ्या, जनावरे सोडतो आहे.एकरी फक्त दोनशे गोण्याच याशिवाय तालुक्यात झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक पातळीवर मजुरांची मोठी टंचाई असते. याशिवाय हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पादनक्षमता घटली आहे. आज एकरी फक्त दोनशे गोण्याच्या आसपास उत्पादन निघते. त्यात गोलटी, चिंगळी, जोड अशा कमी प्रतीच्या कांद्याचा समावेश असतो.हमीभाव द्या!गेल्या दोन वर्षांपासून ही अवस्था आहे. त्यामुळे कांदापिकास हमीभाव मिळावा, बारदाना व वाहतूकखर्च वाचवावा, विक्रीचे नियोजन असावे, वर्षभर कांदा निर्यात चालू असावी. तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला तरच शेती आणि शेतकरी जगू शकेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.२०० गोणी कांदा काढून तयार आहे. बाजाराअभावी सर्व कांदा शेतातच पडून आहे. - बाळासाहेब जगदाळे, शेतकरी करडेगतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांदा वखारीत पडून आहे. मातीमोल भावाने तरी कसा विकावा ?- अनिल पवार, शेतकरी चिंचणीकांद्याचा उत्पादनखर्चच भागत नाही. ५० गोणींची पट्टी मिळाली फक्त दोन हजार रुपये. कांदा न पिकवलेला बरा -खंडू माने,शेतकरी शिंदोडी
अशी ही ‘तऱ्हा’: उत्पादनखर्च सोडाच, बाजारात पोहोचविण्याचाच खर्चही निघत नाही
By admin | Published: May 29, 2017 2:16 AM