पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कोथरूड डेपोतील ५० ते ६० खासगी कंत्राटी बसचालकांनी वेळेवर वेतन दिले जात नसल्याने बुधवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे प्रवासी आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले. पगार वेळेवर करणार, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २ वाजता संप मागे घेण्यात आला.पीएमपीच्या जेएनएनआरयूएम मधून मिळालेल्या जवळपास २०० गाड्या प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवते. या बसच्या चालकांचे पगार वेळेवर होत नाहीत. आॅगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्याची १३ तारीख आली, तरी मिळालेला नसल्याने बसचालक नाराज होते. यामुळे बुधवारी सकाळी ५० ते ६० चालकांनी संप केला होता. अखेर प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रसन्न पटवर्धन यांनी संप करणाºया चालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. वारजे माळवाडी ते वाघोली, कोथरूड ते विश्रांतवाडी, एनडीए गेट ते मनपा भवन, कोथरूड ते कात्रज, कोथरूड ते कोंढवा या मार्गांवर धावणाºया बसची सेवा विस्कळीत झाली होती. या मार्गांवर अन्य मार्गांवरील बस पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आला असल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाºयांनी दिली.प्रसन्न कंपनीचे कामगार म्हणाले, ‘‘आम्हाला कंपनीतर्फे दोन टप्प्यांत पगार मिळतो. तोही वेळेवर होत नाही. पगाराचा पहिला हप्ता १० तारखेच्या सुमारास व उर्वरित २४ तारखेनंतर दिला जातो. त्यामुळे आम्हाला आमचा कौटुंबिक खर्च भागविण्यास फारच ओढाताण करावी लागते. कामगार कायद्याचा विचार करता, आम्हाला कोणतेही संरक्षण नाही.’’ पीएमपीएलकडे रोजंदारी तत्त्वावर असलेले वाहक म्हणाले, ‘‘प्रसन्नच्या कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे आमचा रोजगार बुडाला.’’आम्हाला महिन्यातून निम्मे दिवसही काम मिळत नाही. याबाबत व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कोथरूड डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी अचानक ६० बस कमी झाल्याने वाहतूकव्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे मान्य केले.
पीएमपी कामगारांचा अचानक संप, प्रवाशांचे झाले हाल, दुपारी दोननंतर वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:59 AM