शिक्रापूर : वाजेवाडी (ता. शिरूर) येथील चौफुला चौकात गुुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका पाणीपुरी विक्रेतेच्या राहत्या घरात रेफ्रिजरेटरचा अचानक स्फोट झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील वाजेवाडी हद्दीत चौफुला चौकात असलेल्या योगेश खंडू शेळके यांच्या इमारतीत भाडेकरू रमेश चंद्र आहेर हा पाणीपुरी विक्रेता वास्तव्यास होता. त्याच्या खोलीत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या खोलीलगत रस्त्याच्या बाजूने असलेल्या नव्याने सुरू केलेल्या चप्पल आणि कपड्याच्या दुकानातून स्फोट बाहेर निघाला. मात्र या दुकानात असलेला दुकान मालक अमित मोहन तिखे (वय २५ ) आणि त्याचा मित्र शंकर उर्फ बंटी सुरेश साबळे (वय २३) हे दोघेही स्फोटात दुकानाच्या बाहेर फेकले गेले. त्यात भाजल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की दुकानाच्या दरवाजा आणि काचा चारशे ते पाचशे फूट लांब रस्त्यावर उडून पडल्या.स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. मात्र दादा वाजे या युवकाने तात्काळ धावून येत रुग्णवाहिकेची वाट न बघता गंभीर जखमी झालेल्या दोन्ही युवकांना स्वतःच्या कारने शिक्रापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान ही घटना शिक्रापूर पोलिसांना समजताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर, उपनिरीक्षक राजेश माळी, हवालदार प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
परिसरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मात्र पोलिसांनी पाहणी केल्यानंतर रेफ्रिजरेटरच्या आतील गॅसचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.