धनकवडी : पुणे शहरात पीएमपी बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. बस बंद पडण्याच्या आणि बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत याचीच प्रचिती धनकवडी येथील भारती विद्यापीठ मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली. भारती विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शुक्रवारी रात्री दोन वाजता बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेतली. रात्रीची वेळ असल्याने गाडीत प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब बसला लागलेली आग आटोक्यात आणली.
स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी रात्री स्वारगेट डेपो वरुन हि बस कात्रज कडे गँस भरण्यासाठी जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर बस आल्यावर बसचे इंजिन गरम झाले आणि इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक वसंत कदम यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. आणि अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला.
कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान ताडेल ढवळे , चालक शाबिर शेख , देवदूतचा चालक राहुल मालुसरेफायरमन वसंत भिलारे, किरण पाटील, तेजस माडवकर, भरत वाडकर, सागर इंगळे, निलेश तागुंदे, श्रीकांत वाघमोडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने गाडीमध्ये प्रवासी नव्हते मात्र धूर मोठ्या प्रमाणात येत होता. बसच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली होती. जवानांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले. इंजिन मधून येत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील धुरामुळे आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले, त्याने लगेच अग्निशामक केंद्राला संपर्क साधला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.