लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा ऊर्फ जैन याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.
सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनघा मोडक तसेच औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु हे सुधीर भटेवरा याच्या घरी १५ मार्च रोजी रात्री आले होते. शर्मा आणि संधु यांच्यासाठी भटेवरा याने २५ लाख रुपयांची सोय केली होती. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन २५ लाख रुपये जप्त केले होते. यावेळी सुधीर भटेवरा याला चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची ४१ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सुधीर भटेवरा हा पळून गेला होता. त्यामुळे सायबर पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली.
पोलिसांनी सुधीर भटेवरा याच्याबरोबर इतर १३ आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की, सुधीर भटेवरा याच्याकडून २५ लाख रुपये जप्त केले आहे. ते त्याने कोणाकडून आणले, त्याच्या मोबदल्यात त्याला इतर आरोपींकडून कोणता डेटा मिळणार होता. राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु यांच्याशी त्याचा संपर्क कसा झाला. त्यांना मिळालेल्या बँक खात्यांचा डेटाचा ते पैसे काढण्यासाठी कसा उपयोग करणार होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. हा सर्व क्लिष्ट तपास आहे. या खात्यांबाबत बँकांकडून माहिती आली आहे. ती पडताळून पाहून त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले.