पुणे : राज्य सरकारकडून ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. परंतु, केवळ नदी यात्रा काढण्यामध्येच सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांना पुण्यातील नदी सुधारबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी हे खाते माझ्याकडे नाही, त्यामुळे मला त्याची माहिती नसल्याचे सांगितले. एकीकडे ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर बैठक घेत असताना दुसरीकडे मात्र नदी सुधारबाबत ‘कोरडे पाषाण’ असल्याचे समोर आले आहे. यामुळे नदीप्रेमीदेखील अवाक झाले आहेत.
राज्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविला जात आहे. ज्यामधून नदीला स्वच्छ करण्यासाठी काम केले जात आहे. विविध उपक्रमही घेतले जात आहे. त्याविषयीचा अध्यादेश सांस्कृतिक विभागाने काढला होता. परंतु, नदी स्वच्छ करण्यासाठी खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना काहीच देणे-घेणे नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. वन भवन येथे बुधवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली खास ‘चला जाणूया नदीला’ यावर बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी जलबिरादरी व इतर संस्थांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली. या बैठकीला वन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे मी आता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या विषयी पत्र लिहिणार आहे. सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन नद्यांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला हवा.’’
ठिकठिकाणी नदी महोत्सव आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले. नदी विषयावर मालिका तयार करता येईल का ? त्याला मी पैसे देतो, असेही त्यांनी बैठकीत आवाहन केले.
---------------------------
मासेमारी करणाऱ्यांची नोंद नाही
मुनगंटीवार यांच्याकडे मत्स्य मंत्रालयाचा कारभार आहे. त्यामुळे पवना नदीकाठी असणाऱ्या मासेमारी व्यावसायिकांची नोंद कुठेच नसल्याचे जलबिरादरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या मासेमारी करणाऱ्यांची सरकार दरबारी नोंद करून त्यांनाही नुकसानीची मदत मिळणे अपेक्षित आहे, त्यांच्याविषयी ठोस धोरण करावे, अशी मागणी या वेळी मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.
-----------------------------------------