पुणे : तब्बल १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी व भाच्यांकडून तब्बल ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात सुळे यांनी ही माहिती दिली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. अजित पवार यांच्या चुलत बहिण आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याकडून २२ लाख रुपये आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये उसने घेतले आहेत. कोणत्याही बॅँकेचे कर्ज सुप्रिया सुळे यांनी घेतलेले नाही. २०१३-१४ या आर्थिक वर्षात सुळे यांनी १ कोटी १४ लाख, २०१४-१५ मध्ये ७१लाख १४ हजार, २०१५-१६ मध्ये ९० लाख ५४ हजार, २०१६-१७ मध्ये २ कोटी ४० लाख आणि २०१७-१८ मध्ये १ कोटी २९ लाख रुपये वार्षिक उत्पन्न दाखविले आहे.
पार्थ पवार हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी इंगल्ंडमधून कायद्याची पदवी मिळाविली आहे. सध्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहेत. अमीको अॅग्री कमोडीटीस, एफपी रिअॅल्टिी प्रा. लि., भैरवनाथ कन्सल्टन्सी, अॅवा ग्लोबल लॉजीस्टिक्स, सु तारा अॅग्रो प्रा. लि., रेवती बिल्डकॉन या कंपन्यांवर ते संचालक म्हणून काम करतात. सुनेत्रा पवार या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आणि विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीबरोबरच कुटुंबाच्या संपत्तीची माहिती देणे बंधनकारक केले आहे. अर्जाचे स्वरूप पदलेले असल्यामुळे आर्थिक बाबींची सखोल माहिती भरून घेतली जात आहे. त्यात उमेदवारावर किती कर्ज आहे किंवा इतर कोणाकडून घेतलेली रक्कम तो देणेकरी आहे का? याबाबतची माहिती विचारली आहे.कर्ज असतानाही दाखविले नाहीविशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी २०१४ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे दाखविले होते. त्यामुळे २०१४ नंतरच त्यांनी सुनेत्रा आणि पार्थ यांच्याकडून कर्ज घेतले असल्याचेही स्पष्ट होते.२०१४ मध्ये अजित पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३८ कोटी रुपयांची संपत्ती आणि १२ कोटी रुपयांचे कर्ज दाखविले होते. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये अजित पवार यांनी आपले उत्पन्न १ कोटी ३६ लाख रुपये आणि पत्नी सुनेत्रा यांचे उत्पन्न ५२ लाख ५८ हजार रुपये दाखविले होते.