कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतलेत- नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:38 PM2021-10-23T13:38:06+5:302021-10-23T13:42:16+5:30
भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला.
पुणे: साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सांगितले. पत्रकार संघातील कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेची गुर्मी चढली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष गेले. असे असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती लसीकरणाचे सेलिब्रेशन करत असेल तर दुर्दैवी आहे. कोरोनावर त्यांना प्रभावी ऊपाय करता आले नाहीत, उपचारांमध्येही भ्रष्टाचार केला. लक्ष दुसरीकडे वळवायचे म्हणून असले ऊद्योग त्यांना सुचतात.
ड्रग्जबाबत बोलताना पटोले म्हणाले, देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात कसे याची चौकशी व्हायला हवी. यात भाजपाच्या निकटचे बडे उद्योगपती व भाजपाचे लोकही गुंतले असल्याचा काँग्रेसला संशय आहे. कोणकोण भागीदार आहे, कोणाचा हात आहे हे सगळे तपासात येईल, पण देशाच्या तरूणाईला अशा प्रकारे नादाला लावणे काँग्रेस खपवून घेणार नाही. शाहरूख खानच्या पोराच्या ड्रग प्रकरणाला भाजपा हिंदू मुस्लिम असा रंग देत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. सावरकर वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा वापर ते करतात, काँग्रेस नाही. कोणावर प्रेम कोणावर राग हा काँग्रेसचा विषयच नाही असे पटोले म्हणाले.
भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला. निवडणूक कशी लढणार हे आम्ही एकदा सांगितले आहे, त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. काही गोष्टी सांगता येत नाहीत. संजय राऊत काय म्हणाले किंवा आणखी कोणी काय म्हणाले यावर आम्ही बोलणार नाही. आमचे ठरले आहे, काम सुरू आहे असे सांगत पटोले यांंनी निवडणूक विषयावर बोलणे टाळले.