पुणे : जिल्ह्यात आजही रेशनिंगवर मिळणाऱ्या धान्यावरच जगणाऱ्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे; परंतु शासनाकडून केवळ तांदूळ आणि गहू दिला जातो. यामध्ये केवळ अंत्योदय कुटुंबाला दरमहा एक किलो साखर दिली जाते. आतापर्यंत ही साखर सुट्टी दिली जात असल्याने रेशनिंग दुकानदारांकडून मापात काटा मारला जात होता; परंतु आता पॅकबंद साखर मिळणार असल्याने ही फसवणूक थांबणार आहे.
शासनाकडून पूर्वी रेशनिंगवर गहू, तांदूळ, डाळी, साखर, पामतेल, साबण अशा अनेक वस्तू दिल्या जात होत्या. त्यानंतर केवळ दिवाळीमध्ये या सर्व वस्तूंचे वाटप केले जात होते. आता तर केवळ गहू आणि तांदूळ याचेच वाटप केले जात आहे. तेदेखील सरसकट रेशनकार्डधारकांना वाटप न करता केवळ खरंच गरज असलेल्या लाभार्थींना हे वाटप केले जाते. जिल्ह्यात साठेआठ लाखांपेक्षा अधिक रेशन कार्डधारक असून, यापैकी थोड्याच लोकांना धान्य वाटप केले जाते. तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना साखर देण्यात येत आहे. आतापर्यंत सुट्टी मिळणारी एक किलो साखर पॅकबंद दिली जाणार आहे.
कोणत्या तालुक्यात अंत्योदयचे किती लाभार्थी
तालुका अंत्योदय लाभार्थी साखर ( क्विंटल )
आंबेगाव 5143 51.43
बारामती 7937 71.37
भोर 1899 18.99
दौंड 7406 74.06
हवेली 207 3
इंदापूर 4579 45.79
जुन्नर 6777 67.77
खेड 3005 30.05
मावळ 1853 17.53
मुळशी 477 4.77
पुरंदर 5216 52.16
शिरूर 4130 41.3
वेल्हा 519 5.19
एकूण 49048 490.48
एक हजार दुकानातून वितरण
जिल्ह्यात १ हजार ८१५ रेशनिंग दुकाने असून, या सर्व दुकानात अंत्योदय रेशन कार्डधारकांना पॅकबंद साखर वाटप होणार आहे.
अद्याप शासनाचे आदेश नाही
सध्या शासनाकडून अंत्योदय कुटुंबाला दर महिन्याला एक किलो सुट्टी साखर वाटप केली जाते. परंतु पॅकबंद पध्दतीनुसार साखर वाटप करण्यासंदर्भात कोणतेही आदेश शासनाकडून आले नसून, आदेश आल्यानंतर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.
- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी