आशाबाई खाटमोडे यांचा अनुभव : कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
*पॉझिटिव्ह स्टोरी*
आशाबाई सुभाष खाटमोडे... वय वर्षे ५६... त्या मूळच्या केतुर नंबर २, करमाळा तालुका, सोलापूर जिल्ह्यातल्या. डोकेदुखी, अंगावर काटा येणे, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे दिसायला लागल्याने त्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेल्या. तापाने तोंड कडू झाले होते. मुलांना फोन करून त्यांनी कल्पना दिली. त्या वेळी त्यांची शुगर लेव्हल ४०० इतकी होती.
सहाव्या दिवशी त्यांना मुलाने पुण्यात आणले. खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली, पण दोन दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. शुगर लेव्हल ७५० च्या पुढे गेली होती. अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आणि उपचार सुरू करण्यात आले. ऑक्सिजन लावण्यात आला. सिटी स्कॅन केल्यानंतर न्युमोनियाचे इन्फेक्शन ५२% झाल्याचे निदान झाले. आशाबाई मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सर्व उपचारांना सामोरे जात होत्या.
अभंग, हरिपाठ, जप करण्यात त्यांनी स्वतःचे मन गुंतवून ठेवले. त्यांची पांडुरंगावर कमालीची श्रद्धा आहे. आयुष्यात काही पुण्याई केली असेल तर आपण यातून नक्कीच बाहेर पडू, असा त्यांना विश्वास वाटत होता. पुढच्या चार दिवसांतच त्यांची तब्येत हळूहळू सुधारू लागली आणि त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
आशाबाई सांगतात, “पती, मुलांनी केलेली धावपळ आणि प्रयत्न फळाला आले. दररोज ते सुका मेवा, फळे घेऊन येत होते. चौथ्या दिवसानंतर तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि मी कोरोनावर मात करू शकले. मानसिक स्थिती आपल्या शारीरिक स्थितीवर मात करते. त्यामुळेच कोरोना रुग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही. यापूर्वी माझ्या मणका, किडनी स्टोन, गर्भाशय अशा चार-पाच प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे मी कोरोनावर मात करेन की नाही, अशी अनेकांना शंका वाटत होती. मात्र ‘खचला तो संपला’ हे मी मनाशी पक्के केले होते आणि त्यामुळेच मी कोरोनासारख्या आजारातून बाहेर येऊ शकले”