पुणे : गेल्या वर्षी साखरेचे विक्रमी १२७ लाख टन उत्पादन घेतल्यानंतर महाराष्ट्रात यंदा १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे देशात राज्याचा अव्वल क्रमांक घसरला असून उत्तर प्रदेशने पुन्हा उत्पादनात बाजी मारली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन १७ टक्क्यांनी घटले आहे. राज्यातील सर्व २१० कारखान्यांची धुराडी आता थंडावली आहे.
गेल्या वर्षीच्या साखर हंगामात १९९ साखर कारखाने सुरू होते. तर १२२३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. उसाचे उत्पादन जास्त झाल्याने राज्यातील काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरू होते. यातून १२७.५ लाख टन साखर उत्पादित झाली. यंदा राज्यात २१० सहकारी व खासगी कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी १०५४ लाख टन उसाचे गाळप केले. यातून १०५.२७ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन यंदा १७ टक्क्यांनी घटले आहे. तर गेल्या वर्षी १०.४२ टक्के साखर उतारा मिळाला होता. यंदा तो ९.९८ टक्क्यांवर घसरला आहे.
या हंगामात उसाचे उत्पादन घटण्यामागे सप्टेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १७५ लाख टन ऊस उत्पादन कमी झाले. त्याप्रमाणे यंदा साखर निर्यातीला केंद्र सरकारने ब्रेक लावला. गेल्या वर्षी देशातून ११० लाख टन साखर निर्यात झाली होती. त्यात राज्याचा वाटा सुमारे ७५ लाख टन इतक होता. यंदा मात्र, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार केवळ ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली होती. हा कोटा सुरुवातीच्या उत्पादनातूनच पूर्ण करण्यात आला. त्यामुळे यंदा १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली. त्याचाही परिणाम एकूण साखर उत्पादनावर झाला आहे.
याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “सततच्या पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम होऊन उत्पादनावरही परिणाम झाला. यंदा पावसाच्या प्रमाणावर ऊस लागवड ठरणार आहे.” पुढील हंगामातही लागवड कमी होण्याचा अंदाज सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, अशी शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यंदा उत्तर प्रदेशात सुमारे ११५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आघाडीवर असेल. त्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो. देशभरात आतापर्यंत एकूण ३२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.