नारायणगाव : केंद्र सरकारच्या इथेनॉलनिर्मिती व खरेदी धोरण साखर कारखान्यास आर्थिक उपलब्धता होणेसाठी चांगले असल्याने साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉलनिर्मितीवर भर देऊन आसवणी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण करावे, अशी सूचना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जुन्नर तालुक्यातील निवृत्तीनगर येथील श्री विघ्नहर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत प्रादेशिक सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके हे उपस्थित होते. याप्रसंगी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, सेक्रेटरी अरुण थोरवे, प्रमुख शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे, मुख्य लेखापाल सुधिर भालेराव, मुख्य अभियंता बाळासाहेब शिंदे, मुख्य रसायनतज्ञ हरीभाऊ चोळके, आसवणी प्रकल्प प्रमुख प्रकाश पवार आदींसह विघ्नहर कारखान्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
सत्यशिल शेरकर म्हणाले की, राज्याचे साखर आयुक्त यांच्या माध्यमातून जपान देशाच्या जायका प्रोजेक्टचे ' उ ओतानी ' कंपनीचे ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) मागील ऊस गाळप हंगाम २०१९-२० मध्ये चाचणी घेण्यासाठी संपूर्ण देशातून महाराष्ट्र राज्यातील एकमेव श्री विघ्नहर कारखान्याची निवड करण्यात आली होती. ही चाचणी सुरु असून या हंगामातही ऊसतोडणी यंत्राच्या सहाय्याने विघ्नहरच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरु असलेल्या ऊसतोडणीचे कामाची साखर आयुक्तांनी प्रत्यक्ष ऊसतोड सुरु असलेल्या प्लॉटवर जाऊन ऊसतोडणी यंत्राची पाहणी केली व त्याची माहिती घेतली. विघ्नहरकडून सुरु असलेल्या ऊसतोडणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
विघ्नहर कारखाना ऊस गाळप करीत असताना केले जात असलेले उत्कृष्ट प्रकारचे नियोजन व तंत्रज्ञान याबाबत सविस्तर व मुद्देसूद अशी माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर व उपस्थित अधिकारी वर्गाने साखर आयुक्त यांना दिली. कारखान्याने उभारलेला सहवीजनिर्मिती प्रकल्प अधिकाधिक क्षमतेने सुरु राहण्यासाठी बसविण्यात आलेल्या विविध सिस्टीमची त्याचप्रमाणे डिस्टीलरी प्रकल्पात अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मिती कशा प्रकारे केली जाते , याविषयी साखर आयुक्त यांनी सखोल माहिती घेऊन साखर निर्मितीकरिता केले जात असलेले विशेष कामकाज, कारखान्याचा को- जनरेशन आणि डिस्टीलरी प्रकल्प साखर उद्योगाला निश्चितपणे आदर्श व मार्गदर्शक ठरणारे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
१२ नारायणगाव कारखाना
शेखर गायकवाड यांचे स्वागत करताना सत्यशिल शेरकर व इतर.