सोमेश्वरनगर : चालू वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांच्या व ऊसउत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या साखरेला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. या महिन्यात २५ दिवसांत तब्बल २८० रुपयांची उसळी साखरेने घेतली आहे. मागील ४ महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ९५३ रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे वाढलेले दर पाहता, आता साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी याचा चांगलाच हातभार लागेल. बुधवारी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तशिरोळ या कारखान्याच्या साखरेला ३४७८ रूपये तर जिल्ह्यात विघ्नहर कारगान्याच्या साखरेला ३४१0 रूपये सर्वाधिक दर मिळाला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. १,९०० रुपये एवढ्या नीचांकीवर आलेली साखर आता ३,४७८ रुपयांवर गेली आहे. गेल्या ८ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २७८ रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर ५ महिन्यांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. दर वाढण्याअगोदर साखर कारखाने आर्थिक कचाट्यात सापडले होते. शासनाने ठरवून दिलेली एफआरपीसुद्धा देण्याइतपत परिस्थिती नव्हती. एफआरपी मिळणार की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत ऊसउत्पादक सापडले होते. मात्र, नाव्हेंबर महिन्यापासून जसजसे साखरेचे दर वाढू लागले, तशा एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एफआरपीचा ८० : २० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्के प्रमाणे सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केलेले आहेत. आता उर्वरित २० टक्क्यांप्रमाणे ३०० ते ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. या वाढलेल्या साखरेमुळे उर्वरित एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना कोणतीही अडचणी येणार नाही. सध्या साखर जरी वाढली असली, तरी एफआरपीपेक्षा जादा मिळणाऱ्या पैशांचा फायदा ऊसउत्पादकांना जरी मिळणार नसला, तरी त्याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल. अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखानदारी कर्जाच्या खाईत लोटली गेली होती. अनेक कारखान्यांवर करोडो रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे अनेक कारखाने बंदही पडले आहेत आणि जे चालू आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. मात्र, आता साखर वाढल्याने शेतकऱ्यांना कारखाने एफआरपीचे पैसे अदा करून उर्वरित पैसे हे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे साखरेचे अशीच परिस्थिती राहिली, तर कारखाने लवकरच कर्जमुक्त होऊन स्वभांडवली होतील. एफआरपी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारपुढे हात पसरावे लागत होते. (वार्ताहर) १ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरेच्या पोत्यावर २,२७० रुपये मूल्यांकन मिळत होते. ते तब्बल ६०५ रुपयांनी वाढल्याने सध्या २,८७५ रुपये मूल्यांकन मिळत आहे. यामध्ये काल पुन्हा साखर वाढल्याने मूल्यांकनही वाढणार आहे. ज्या पद्धतीने साखरेच्या दराचा आलेख वाढत गेला आहे, त्याप्रमाणे राज्य बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन वाढवून दिले आहे. काल पुन्हा साखर वाढली आहे. ८५ टक्क्यांच्या नियमानुसार साखरेचे मूल्यांकन देण्यात येईल. - रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बँक
साखरेच्या दरात चार महिन्यात क्विंटलमागे ९५३ रुपयांनी वाढ
By admin | Published: March 31, 2016 2:56 AM