शेंडगेवाडी तलावत पाणी होते तोपर्यंत विहिरी, बोअरवेल यांना पाणी होते. तलावात पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल कोरडेठाण पडलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतात ऊस, तरकारी यांसारखी पिके घेतली आहे. परंतु पाण्याअभावी वर्षभर जगवलेला ऊस पूर्णपणे जळून गेलेला आहे. शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळवून देणारे म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते; परंतु पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकरी शेतातही जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
चासकमान आवर्तन जाणून-बजून सोडले जात नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळेच तलाव कोरडा पडला आहे. चासकमानचे आवर्तन या तळ्यात आल्याच्यानंतरच या भागातील पिण्याच्या पाण्यासाह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना भीमा नदीवरून लिप्त स्कीम योजना राबविणे आर्थिकदृष्ट्या खर्चीक आहे. त्यामुळे तलावात पाणी सोडणे हाच उपाय राहतो. तलावात सचारी १९ वरून पाणी सोडल्यास उरळगाव, तांबे वस्ती, कोळपे वस्ती, शेंडगेवाडी, निंबाळकर तलाव या भागातील शेतकरी वर्गांचा फायदा होणार आहे.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी शेतात कोणतेच पीक घेतले नाही. त्यामुळे जमीन पडीक, मोकळी राहिली आहे. या भागातील तलावात पाणी आल्यास शेतकरी शेतात पीक घेऊ शकतो. पिकासाठी केलेला खर्च हा वाया जाणार आहे. त्यामुळे या भागातील तलावात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.