महेश जगताप, सोमेश्वरनगरसाखरेच्या पडलेल्या दरामुळे आता राज्यातील साखर कारखानदारी अगोदर ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेली आहे. मात्र, चालू वर्षी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हातात फक्त टनाला १५०० रुपयेच टेकवत शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. एक एकर ऊसशेतीचा खर्च पाहता आता ऊसउत्पादकही ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेला आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन आता एक महिना उलटला; मात्र कारखान्यांनी अजून ‘एफआरपी’ जाहीर केली नाही, तर दुसरीकडे राज्य बँकेने शेतकऱ्यांना देण्यासाठी टनाला अवघे १४०५ रुपये कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे आता कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार न करता, टनाला १५०० हजार रुपये जमा करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे २२०० रुपये पहिल्या हप्त्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. शेतकऱ्यांचा एकरी खर्च १ लाख ५ हजारांवर गेला आहे. उसाच्या जातींचे उत्पादन घटल्याने एकरी उसाचे टनेज मिळत आहे ६० टन. १५०० हजार रुपयांप्रमाणे हिशेब केल्यास शेतकऱ्यांना ९० हजार रुपये मिळणार आहेत. खर्चातून मिळणारी रक्कम वजा केली असता, ऊसउत्पादक शेतकऱ्याला एकरामागे १५ हजारांचा तोटा सहन करावा लागणार आहे. जवळपास दीड वर्षाच्या पिकात अहोरात्र कष्ट करून शेतकरी तोट्यात गेला आहे. दुसरीकडे खासदार राजू शेट्टींंनी यावर्षी मात्र आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे कारखान्यांचे चांगलेच फावले आहे.
ऊसउत्पादकाला एकरी १७ हजारांचा तोटा!
By admin | Published: December 04, 2014 5:02 AM