पौड (पुणे) : चांदणी चौकात भुगावकडून येणाऱ्या लेनवर ऊस वाहतूक करणारा ट्रक या रस्त्यालगत असलेल्या एका पंक्चरच्या टपरीवर समोरच्या बाजूने उलटला आहे. या अपघातात ट्रक चालकासह पंक्चर काढणारा टपरीवाला किरकोळ जखमी झाले. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
१ मे च्या मुहूर्तावर चांदणी चौकाचे लोकार्पण होणार असल्याने या ठिकाणी उर्वरित कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. याच मार्गांवर भुगावच्या बाजूने येणाऱ्याना पाषाण, बावधन, कोथरूड व बेंगलोर हायवेला जाण्यासाठी उड्डाण पुलाची एक लेन तयार करण्यात आली आहे. या लेनवर सध्या डांबरीकरणाचा शेवटचा हात देण्यात येत आहे. त्यामुळे या लेनमधील अर्धा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याच ठिकाणच्या वळणावर अवजड असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला झोला बसून हा ट्रक (एम एच १२ यु एम ३७४१) रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला.
सुदैवाने हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चर काढण्याच्या टपरीला समोरच्या बाजूने अगदी चिटकून उलटला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व येथील पंक्चरवाला किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यावेळी पंक्चर काढण्यासाठी कोणतेही वाहन या ठिकाणी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला.