सोमेश्वरनगर : कारखान्यातील शेतकी कर्मचाऱ्यांच्या सावळ्या गोंधळाचा फटका शेतकऱ्यांना बसतच आहे. मगरवाडी (ता. बारामती) येथील १ जुलैचा ऊस वाळून त्याच्या खोडक्या झाल्या तरीही शेतातच ठेवला आहे, तर दुसरीकडे १५ जुलैच्या उसाची तोड सुरू आहेत. ऊसतोडीसाठी दारू, कोंबडीची मागणी करणाऱ्या चिटबॉयला कारखाना प्रशासन कधी वटणीवर आणणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मगरवाडी येथे जालिंदर सोरटे यांची ऊसशेती आहे. हा भाग जिरायत असून, मोठ्या कष्टाने त्यांनी ४७ एकर ऊस जगवला आहे. वास्तविक तो ऊस एक महिन्यापूर्वीच तुटून गेला पाहिजे होता. मात्र, कारखान्याच्या शेतकी विभागाने या ४७ एकर ऊस तोडण्यासाठी केवळ एकच टोळी पाठविली. आपला ऊस वेळेत जावा यासाठी सोरटे कुटुंबीय कारखान्याच्या शेतकी विभागात जाऊन कंटाळले. कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याने पाहणी केली तरीही ऊसतोड मजूर वाढवून मिळाले नाहीत. सोरटे यांच्या शेतातील ऊस तोडीच्या बाहेर गेल्याने उसाचे वाढे वाळून गेल्याने उसाच्या मोळ्या बांधण्यासाठी नवीन उसाची वाढी तोडून आणावी लागत आहेत. कारखान्याच्या शेतकी विभागाच्या गलथान कारभारामुळे उभा ऊस जळून चालला आहे. वास्तविक ऊसतोडणी कामागरांना उसाचा फड दाखविणे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून उसाची नोंद व्यवस्थित करून घेणे अशी कामे करावी लागतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून बरेच चिटबॉय उसाच्या फडातच जात नाहीत. ४७ एकरांपैकी ३० ते ३५ एकर ऊस संपला असून, अजूनही १५ एकर ऊस शेतातच उभा आहे. अशीच परिस्थिती सोरटेवाडी व मगरवाडी भागातील शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. सोरटेवाडी परिसरातील चिटबॉय पैसे दिल्याशिवाय उसाला तोडीच देत नसल्याचा आरोप सोरटे यांनी केला आहे. चिटबॉयला पार्टी, कोंबडी दिली तरच उसाला लगेच तोड दिली जाते. सोमेश्वर कारखान्यातील शेतकी विभागातील अनेक चिटबॉय गेल्या अनेक वर्षांपासून उसाच्या फडातच जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ते फडात जाण्याऐवजी कारखान्यावरील एका हॉटेलमध्ये चहा भज्यांवर ताव मारत ऊसतोडणी कामागरांची वाट पाहतात. आणि याच ठिकाणी ऊसतोडणी कामागरांना स्लिपा दिल्या जातात.सध्या गाडी सेंटरची व डोकी सेंटरची १५ जुलै तारखेच्या तोडी सुरू आहेत. सोरटे यांची तोड सुरू केली होती. अजून ऊस शिल्लक असल्याने जास्तीतजास्त वाहने देऊन उर्वरित ऊस तातडीने आणू. - सोमनाथ बेलपत्रे शेतकी अधिकारी सोमेश्वर कारखाना
ऊस वाळून झाल्या खोडक्या तरीही तुटेना !
By admin | Published: December 29, 2014 11:22 PM