लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऊसतोडणीचे काम संपवून आपापल्या जिल्ह्यात परतू लागलेल्या ऊसतोडणी कामगारांना रोजगार हमी योजनेत प्राधान्याने काम द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक उसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केली आहे. या योजनेत कामाची मागणी करणाऱ्या कामगारांकडून प्रशासन मागणीपत्र स्वीकारत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे व राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना याबाबत निवेदन पाठवून यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्यानुसार प्रशासनाने मनरेगात काम मागणाऱ्यांना १५ दिवसांत काम देणे बंधनकारक असल्याने कामाचे मागणीपत्र स्वीकारणे टाळले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
बहुसंख्य जिल्ह्यातील ऊसतोडणीचे काम संपत आले आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत गेलेले ऊसतोडणी कामगार आता अहमदनर, बीड, उस्मानाबाद व मराठवाड्यातील आपापल्या जिल्ह्यात परतू लागले आहेत. राज्यातील अशा कामगारांची संख्या साधारण ५ लाख इतकी आहे.
ऊसतोडणीचे काम संपवून घरी परत आल्यानंतर त्यांना कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक हाल होतात. यावर उपाय म्हणून त्यांना रोजगार हमी योजनेत काम उपलब्ध करून द्यावे, ही संघटनेची मागणी आहे.