पुणे : मी शाळा सोडणारा विद्यार्थी आहे. माझं लक्ष चित्रपटांकडे होते. मला लगेच संधी नाही मिळाली. खूप स्ट्रगल केलं. पहिला चित्रपट केला आणि तो फ्लॉप झाला. मग माझ्या मित्राने मला बीअर बारमध्ये नेले. तिथे नाचणाऱ्या महिला पाहून माझं डोकं सुन्न झालं. त्यानंतर मी ठरवलं की या महिलांवर चित्रपट करायचा आणि मग ‘चांदनी बार’ चित्रपट केला आणि तो यशस्वी झाला, अशी आठवण चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मधुर भांडारकर यांनी सांगितली.
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया' (पश्चिम विभाग)च्या वतीने आयोजित पहिल्या स्क्रीन सिटी चित्रपट रसिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स. प. महाविद्यालयात या संमेलनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर फेडरेशनचे अ. भा. अध्यक्ष किरण व्ही. शांताराम, संयोजक वीरेंद्र चित्राव, डॉ. नितीन ढेपे, डॉ. संदीप पाचपांडे, दिलीप बापट आणि सतीश जकातदार उपस्थित होते.
चित्रपट चळवळ भारतभर पोहोचविण्यासाठी चार दशकांहून अधिक काळ प्रयत्न करणारे पत्रकार, समीक्षक, लेखक सुधीर नांदगावकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संमेलन स्थळाचे नाव स्व. सुधीर नांदगावकर सभागृह असे दिले होते. प्रास्ताविक संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
इंडस्ट्रीत सर्वच गांभीर्याने काम करतात
फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्व लोक गांभीर्याने काम करतात. तिथे कोणीही अय्याशी करत नाहीत. काही जण पितात. मी पण बीअर पितो. परंतु याचा अर्थ असा नसतो की, सर्व इंडस्ट्रीच वाईट आहे आणि तिथे सर्व असेच चालते. तर, लोकांनी हा गैरसमज काढून टाकावा, असे मधुर भांडारकर म्हणाले.
दिग्गज समोर अन् मी व्यासपीठावर
चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यासपीठासमोर बसले होते. ते पाहून चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एखादा माणूस नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री झाला की, तो कोणत्याही व्यासपीठावर बसण्यासाठी पात्र होतो. खरंतर त्याला संबंधित विषयांची काहीही माहिती नसते, तरी त्याला कशाला वर बसवतात हेच कळत नाही. ही एक राजकीय सोय असावी कदाचित. कारण समोर एवढे दिग्गज आहेत आणि मला यातले काहीच कळत नसताना मी व्यासपीठावर आहे,’ या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.