पुणे : पुस्तकांच्या माध्यमातून लेखक व वाचकांमध्ये अनोखे नाते निर्माण होत असते. वाचकांच्या भावविश्वात लेखकाचे स्थान निर्माण होते. आपल्या भावना, मत लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रस्वरूपात संवाद साधला जातो. लेखक सुहास शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्रसंवाद लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रिय सुशि’ या पुस्तकामध्ये १९७३ ते २००३ या तीन दशकांच्या कालखंडात वाचकांनी पाठविलेल्या एक हजार पत्रांचा समावेश केला आहे.रहस्यकथा, लघुकथा व कादंबरी अशा साहित्यकृतींमध्ये हातखंडा असणाऱ्या सुहास शिरवळकर यांच्या कादंबऱ्यांच्या अर्पणपत्रिका यापूर्वीच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. एरंडवणे येथील सतीश छत्रे सभागृह येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सुशिंच्या वाचक प्रतिनिधींच्या हस्ते ‘प्रिय सुशि’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे व मधुमिता बर्वे यांच्यासह सुशिप्रेमी वाचकांचा स्नेहमेळावा यानिमित्ताने भरणार आहे.शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले. त्यातील निवडक पत्रे पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे. काही पत्रांना सुशिंनी दिलेली उत्तरे तसेच फेसबुकवरील दुनियादारी आणि सुहास शिरवळकर या ग्रुपवर वाचकांनी लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे.’ या पुस्तकासाठी सुशिंचे मित्र मिलिंद बोरकर यांचे सहकार्य लाभले आहे.
सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 3:17 PM
सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले.
ठळक मुद्देशिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे.