पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याचे एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. डीएसके गुंतवणुकदाराने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे.
तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कुलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिकसह अनेक शहरातील नागरिकांनी हजारो कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यात असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. अनेकांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळणारे पैसे डीएसके यांच्या कंपनीत गुंतविले होते. त्यातून मिळणाऱ्या मासिक व्याजावर आपला खर्च भागविण्याचा प्लॅनिंग त्यांनी केले होते. मात्र, डी. एस. कुलकर्णी यांनी हे पैसे व्यवसायात न लावता इतरत्र वळविले होते. त्यातून लोकांची देणी देणे शक्य न झाल्याने त्यांना गेल्या वर्षी फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीसह अटक झाली आहे. सध्या ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तानाजी कोरके यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत ४ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्याची मुदत २०१७ मध्ये संपली. मात्र, त्याचे व्याज आणि मुद्दल त्यांना परत मिळाले नाही. त्यामुळे मुलीचे लग्न करु शकत नसल्याची खंत त्यांना होती. त्यातून त्यांनी काल रात्री सर्व जण झोपल्यावर दोरीने घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घरातील लोक उठले असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
मुंढवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली. त्यात त्यांनी डीएसकेमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळत नाहीत. आणि मुलीचे लग्न करुन शकत नसल्याने आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरु नये, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आणखी बातम्या..
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण