शिरूर : पुणे- नगर रस्त्यावर वरील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवर असलेल्या पुलावरून एका इसमाने उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी ( दि. २१) सकाळच्या सुमारास घडली आहे. भीमा नदीवरील पुलावरील रस्त्याने आज सकाळच्या सुमारास संदीप बबनराव कवडे (वय ४६ रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे ) हे त्यांच्या ताब्यातील (एमएच .१६ एस. १५७७ ) ही दुचाकी घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी अचानक रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून नदीवरील पुलावरून उडी मारली.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, राजेंद्र पवार, निरज पिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत सदर इसमाच्या खिशातील डायरी व मोबाईलच्या आधारे नातेवाइकांशी संपर्क करत माहिती दिली. कवडे यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी मृत संदीप कवडे यांचा मृतदेह ओळखला. याबाबत कोरेगाव भीमाच्या पोलीस पाटील मालन रामदास गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि .पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.