लोकमत न्यूज नेटवर्क
पाटस : कुसेगाव (ता. दौंड) येथे वन विभागाच्या जंगलात प्रेमी युगलाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २३) सकाळी उघडकीस आली. त्यांच्या विवाहास घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
किरण क्षीरसागर (वय २५, रा. नानवीज, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मुलगी अल्पवयीन असून पाटस (ता. दौंड) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसेगाव परिसरातील जंगलात युवक आणि युवती कीटकनाशक पिऊन पडलेले असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण हे घटनास्थळी गेले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघेही नात्यातील असून त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.