पुणे : हुंडा व घरगुती हिंसाचारामुळे पत्नीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पती, सासू व नणंद यांच्यावर विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. मात्र, मानसिक व शारीरिक छळ केल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात सबळ पुरावा सादर करता न आल्याने पती, सासू व नणंद या तिघांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस गुल्हाणे यांनी निर्दोष मुक्तता केली.
पती रवी ऊर्फ रवींद्र राजू नागडे, आई उज्ज्वल आणि बहीण राधिका अशोक वाळके अशी निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे आहेत. रवी याचा बबिता यांच्याशी २००१ मध्ये विवाह झाला. मात्र, माहेरून लग्नात हुंडा कमी मिळाला तसेच सोने घेऊन ये, या कारणासाठी तिला वेळोवेळी अर्धपोटी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. यावरून तिघांविरुद्ध निगडी पोलिस स्टेशन येथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. निगडी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. सरकार पक्षाने आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी पक्षाने घटनेच्या वेळी विवाहित महिला ही चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे ती आत्महत्या करूच शकत नाही.
आरोपींनीच तिच्या गळ्याभोवती फास आवळला तसेच ही घटना लग्नानंतर १ वर्षाच्या आत कालावधीत घडलेली असल्याने कायद्याची गृहितके या खटल्याला लागू होतात. त्यामुळे त्यांना कायदेशीर तरतुदींच्या आधारे कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी सरकारी पक्षाने मागणी केली. त्यावर निव्वळ संशय व ऐकीव माहितीच्या आधारे आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकील ॲड. शुभांगी परुळेकर यांनी केला. दोन्ही पक्षांनी सादर केलेला पुरावा व पोलिस तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड. परुळेकर यांना ॲड. विजयालक्ष्मी शिंदे, ॲड. अजय बामगुडे, प्राजक्ता पाटील यांनी खटल्यात मदत केली.