पुणे : लग्न झाल्यानंतर मधुचंद्राची रात्र ही प्रत्येक नववधूसाठी आणि वरासाठी संस्मरणीय रात्र असते. असे म्हणतात. पण, एका नववधूसाठी ती काळ रात्र ठरली. मधुचंद्राच्या रात्री पतीने चारित्र्याचा संशय घेऊन तिला असा काही त्रास दिला की, नवविवाहितेने नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
हडपसर पोलिसांनी तिचा पती किशोर देवारामजी परमार (रा. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी किशोर परमान (वय २१, रा. मांजरी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचे वडील चेनाराम बोराना (रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी लक्ष्मी हिचे औरंगाबाद येथील किशोर परमार याच्याशी १२ डिसेंबर २१ रोजी राजस्थान येथील सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झाले. त्यानंतर ते सासरी औरंगाबादला गेले. तिच्याबरोबर करवली म्हणून त्यांच्या नात्यातील मुलगी गेली होती.
आठवड्याभरानंतर लक्ष्मी पुन्हा माहेरी आली. किशोर व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे सांगून आपला छळ करीत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर तिने १९ जानेवारी २२ रोजी माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर त्यांच्या दुसऱ्या मुलीने लक्ष्मी व किशोर यांच्यातील फोनवर झालेले रेकॉर्डिंग ऐकविले. त्यात किशोर इंस्टाग्राम व व्हॉटस्-ॲपवरील संदेशावरून तिच्या चारित्र्याचा संशय घेत असून, तिला जगावेसे वाटत नसल्याचे त्यात ती म्हणत होती. त्यानंतर त्यांनी तिच्याबरोबर करवली म्हणून केलेल्या मुलीला विचारले, तेव्हा तिने सांगितले की, मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्यादिवशी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर डाग दिसले. त्याबद्दल विचारल्यावर किशोर चावल्याचे तिने सांगितल्याचे या करवलीने सांगितले. त्यानंतर लक्ष्मीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.