पुणे : आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. आपण तर शिक्षणासाठी येथे आलो असताना हे काय होऊन बसले, या विचाराने काहीही सुचत नव्हते. पुण्याला आईला फोन केला तेव्हा तिने इथेही घरी पोलीस येऊन गेले. त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे पोलिसांशी बोलून आपण कोठे आहोत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. परंतु, २६ जानेवारीमुळे काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे कोणाशी संपर्क साधू शकत नव्हते. कॉलेजही बंद होते. त्यामुळे मी स्वत: पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरला जाताना वाटेत चेकपोस्टवर थांबविण्यात आले. तेव्हा मी आपण पुण्याहून आलो असून सादिया शेख नाव असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पुढील काही दिवस सर्व तपास यंत्रणांनी आपली सखोल चौकशी केली. परंतु, काहीच नसल्याने त्यांना आपल्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही. त्यांनी आपल्याला आईकडे सुपूर्त केल्याचे सादिया शेख हिने सांगितले.
आत्मघातकी हल्ला करण्याच्या इराद्याने पुण्यातील १८ वर्षाची तरुणी काश्मीरमध्ये आल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर सादिया शेख व तिच्या आईवर गुर्दलेल्या प्रसंगाची माहिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितली. यावेळी मुळनिवास मुस्लिमचे अंजुम इनामदार, अॅड़ दिनेश गिते आदि उपस्थित होते. सादिया शेख हिने सांगितले की, २०१५ मध्ये आपण फेसबुकवर खुप अॅक्टिव्ह होतो. त्यातून काही तरुणांच्या संपर्कात आलो होते. सुदैवाने एटीएस व मौलवींच्या मदतीने त्यातून बाहेर पडलो. पण इथे शिक्षण घेणे अवघड झाल्याने नर्सिगच्या कोर्ससाठी आपल्या मैत्रिणीने काश्मीरमध्ये तुझे येथील कॉलेजमध्ये अॅडमिशन करुन देऊ असे सांगितले. त्यानुसार मी व आई १५ जानेवारीला दक्षिण काश्मीरला गेलो. तेथील कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्या काळात मैत्रिणीने राहण्याची सोय केली होती. त्यानंतर अचानक २३ जानेवारीपासून बातम्या येऊ लागल्या की, पुण्यातील तरुणी २६ जानेवारीच्या परेडमध्ये किंवा परिसरात आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता आहे. ही बातमी आपण एका वृत्तपत्रात आपल्या नावानिशी वाचल्याने धक्काच बसला. आईला फोन केल्यावर तिनेही येथील पोलीस घरी येऊन गेले. तुझा ठाव ठिकाणा विचारत होते. तू त्यांच्याशी किंवा काश्मीरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलून असे काही नाही हे सांगावे अथवा पुण्यात येऊन पोलिसांची भेट घ्यावी, असे पोलिसांनी सुचविल्याचे आईने आपल्याला सांगितले. त्यावर काय करावे, काहीच सुचत नव्हते. काश्मीरमध्ये अशा प्रसंगी इंटरनेटची सेवा बंद केली जाते. त्याप्रमाणे २५ जानेवारीला इंटरनेट बंद पडले. त्यामुळे पुन्हा आईशी संपर्क होऊ शकला नाही़ काही अंतरावर असलेले कॉलेजही बंद होते़ आपण श्रीनगरला जाऊन पोलिसांना सांगण्याचे ठरविले. वाटेत चेकपोस्टवर पोलिसांनी गाडी थांबविली़ तेव्हा आपण खाली उतरुन चेकपोस्टवरील पोलिसांना सांगितले की, मी पुण्याची असून सादिया शेख आपले नाव आहे. त्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली. मोबाईलची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर सर्व तपास यंत्रणांनी आपल्याकडे चौकशी केली. त्यांना काहीही न आढळल्याने त्यांनी सोडून दिले.
सादिया शेखची आईने सांगितले की, या अगोदरचा अनुभव वाईट असल्याने व सादियाशी संपर्क होऊ शकत नसल्याने तसेच येणा-या बातम्या पाहून संपूर्णपणे गोंधळून गेलो होतो. त्यामुळे जेव्हा पुणे पोलिसांनी सादियाचा ठावठिकाणा विचारला तेव्हा त्यांना आपण ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली असल्याचे सांगितले. पण, अधिक माहिती देण्यास नकार दिला होता. या संपूर्ण प्रकारामुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
अंजुम इनामदार यांनी सांगितले की, कोणताही गुन्हा नसताना व काहीही तथ्य नसताना केवळ एका इशा-यावरुन मिडिया ट्रायल झाल्याने शेख कुटुंबियांची या संपूर्ण प्रकरणात बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांना आता बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे. आमची संघटना त्यांच्या पाठीशी असून त्यांच्याशी नियमित संपर्कात राहणार आहोत. याबाबत काय कायदेशीर कारवाई करायची याबाबत आम्ही दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे अॅड. गिते यांनी सांगितले.