लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : भीमाशंकरजवळ निगडाळे गावच्या हद्दीतील जंगलात भोसे (ता. खेड) येथील कैलास रामदास गांडेकर (वय २८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कैलास याचा नुकताच दि.९ मे रोजी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कैलास हा दि.२२ रोजी घरातून कंपनीत कामासाठी जातो म्हणून बाहेर पडला. परंतू रात्री आलाच नाही. याबाबत कुटूंबीयांनी नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली. मात्र, त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. म्हणून त्याचा चुलत भाऊ विकास याने चाकण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारदेखील दिली होती. तेव्हापासून घरातील लोक त्याचा शोध घेत होते, त्यांनी भीमाशंकरमध्ये येवूनही तपास केला होता. दरम्यान भीमाशंकर वन्यजीव विभागाचा कर्मचारी प्रविणकुमार लांघी यांनी निगडाळे गावच्या हद्दीत वन्यजीव विभागाच्या जंगलात झाडाला दोरी बांधून एकाने आत्महत्या केल्याचे दिसले. जवळच दुचाकी असल्याचे दिसले. प्रवीणकुमार लांघी यांच्याकडे मृत कैलास गांडेकर याच्या नातेवाईकांनी यापुर्वी चौकशी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याचा भाऊ विकास याला फोन करून या घटनेबाबत कळविले. नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला असता हा कैलास रामदास गांडेकर असल्याचे सांगितले. कैलास गांडेकर याचे दि.९ मे रोजीच त्याचे लग्न झाले होते. घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेहाची पहाणी केली असता मृतदेह अतिशय खराब व कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. हे पाहून सदर व्यक्तिने पाच ते सहा दिवसांपुर्वी म्हणजे २२ तारखेला आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला. कैलास याने आत्महत्या का केली, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर करत आहेत.
भीमाशंकर जंगलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: May 31, 2017 1:30 AM