पुणे : साथीदाराने दुसऱ्या एका तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने लिव इन रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या तरुणीने फसवणूक झाल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी संगणक अभियंता होती. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता असलेल्या तरुणास अटक केली.
श्वेता अरुण बिश्वास (वय 30, रा. निर्मला निवास, दस्तुर रोड, कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल बिश्वास (वय 22, रा. बीड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर सचिन बबन कासिद (वय 29, रा. स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्वेता ही फिर्यादी यांची बहिण आहे. श्वेता एका नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तसेच तिचा मित्र सचिन कासीद हाही खराडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. श्वेता व सचिन हे दोघेही मागील काही वर्षांपासून "लिव इन रिलेशनशीप'मध्ये रहात होते. ते दोघे सचिनच्या फुरसुंगी येथील घरी एकत्र राहात होते. मागील रविवारी सचिन हा बार्शीमधील त्याच्या मुळ गावी गेला होता. त्यावेळी त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिकडे एक मुलगी पाहीली.
सचिनला ती मुलगी आवडल्याने त्याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे ठरविले होते. ही बाब श्वेताला कळ्याने श्वेता व सचिनचे वाद झाले होते. या सर्व प्रकारामुळे श्वेता नैराश्येत गेली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी तिने तिच्या आईला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तीने फोन उचलला नव्हता. दरम्यान, बुधवारी तिने सचिनच्या फुरसुंगी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे करत आहेत.