दौंड - माहिती अधिकारात जागेविषयी माहिती मिळण्यासाठी अर्ज केल्यामुळे नगरसेवक आणि राजकीय पुढाºयांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दौंडमध्ये घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल तसेच जागेच्या वादाबद्दल माहिती देऊन पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई करण्याची विनंती केली आहे. दौंड शहरासह जिल्ह्यामध्ये या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.निसार शेख (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी त्यांची पत्नी शन्नो शेख यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ताहेरखान युसूफखान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेल खान, नगरसेवक वसीम इस्माईल शेख, माजी नगरसेवक इस्माईल इब्राहीम शेख, शफीऊल्ला खान अहमद खान, फिरोज शफीऊल्ला खान, अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक, शेख दस्तगीर कादर शेख, ऊबेद बाबुमियाँ खान, अखलाक रहीम खान, तजमुल्ला काझी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.शेख यांनी गोपाळवाडी आणि लिंगाळी येथील मदरसे, शाळा आणि महाविद्यालयाच्या जमिनींची माहिती माहिती अधिकारामध्ये मागविली होती. या जागेच्या मालकीहक्कावरुन वाद निर्माण झालेले आहेत. माहिती अधिकारात खोटी माहिती दिली असा आरोप करीत निसार शेख यांनी याबाबत धर्मादाय आयुक्तांसह, गृहमंत्रालय, वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या. आत्महत्या करण्यापुर्वी निसार यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल स्वत:चे म्हणणे चित्रीकरणाच्या माध्यमातून मांडले आहे. परिवार उघड्यावर येणार असून त्यांच्याकडे लक्ष द्यावे, त्यांची काळजी घ्यावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.हा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करीत असताना निसार शेख अखंडपणे रडत असल्याचे दिसते़ जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी म्हटले आहे़
आत्महत्येपूर्वी मांडली मोबाईलमध्ये कैफियत, व्हिडीओने उडाली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:01 AM