पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून सीएए आणि एनआरसीला विराेध करत आज महाराष्ट्र बंदची हात देण्यात आली आहे. राज्यभरात याला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुण्यातील दांडेकर पूल भागात सुजात आंबेडकर हे स्वतः रस्त्यावर उतरले हाेते. दांडेकर पूल चाैकात त्यांनी काहीकाळ रस्ता राेकाे करण्याचा प्रयत्न केला.
सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांना विराेध करत वंचितकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा कायदा घटनेच्या विराेधात असल्याचा आराेप करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदाेलन करत आहेत. पुण्यात सुजात आंबेडकर यांनी काहीकाळ आंदाेलनात सहभाग घेतला. दांडेकर पूल येथे येत त्यांनी कार्यकर्त्यांसह काहीकाळ रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांना काहीवेळाने रस्त्याच्या बाजूला घेतले.
यावेळी बाेलताना सुजात आंबेडकर म्हणाले, सीएए आणि एनआरसी हे कायदे देशातील लाेकांचे विभाजन करत आहेत. हे कायदे घटनेच्या विराेधातील आहेत. आजचा बंद हा शांततेत करावा असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.