लोणी काळभोर : लसीकरणाच्या श्रेयवादावरून सरपंच गौरी गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुजित काळभोर यांनीही माझ्यासह कुटुंबीयांवर खोटा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे, असा आरोप करून सात जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे.
काळभोर यांनी गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड, अविनाश विजय बडदे, ओम चित्तरंजन गायकवाड, महेश ज्ञानेश्वर काळभोर, अमोल अरविंद काळभोर, सचिन अरविंद काळभोर (रा. सर्व जण कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूलमध्ये कोरोना लसीकरण सुरू होते. यावेळी सरपंच गौरी गायकवाड व सुजित काळभोर यांच्यात मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या होत्या. आता काळभोर यांनी पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार अर्ज दिला आहे. त्यात गायकवाड व त्यांचे कुटुंबीय हे आमच्याविषयी सतत मनात द्वेष व वैरभाव बाळगून वागत आहेत. तसेच त्यांनी यापूर्वीही राजकीय बळाचा वापर करून खोट्या गुन्ह्यात फसविण्याच्या धमक्या दिल्या असल्याचे म्हटले आहे. गायकवाड व त्यांचे कुटुंबीय व इतर कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून राजकीय बळाच्या जोरावर खोटा व बनावट गुन्हा दाखल करून आमची जनमानसात बदनामी करून ते आमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या बेतात आहेत. तसेच त्यांचे सत्य समोर आणल्यामुळे ते आमच्यावर सूड उगविण्यासाठी आमच्या कुटुंबीयाचे व माझे काही बरे वाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमच्या जीवितास वरील सात जणांपासून धोका असल्याचेही त्यात म्हटले आहे.