पुणे : भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करणाऱ्या तिन्ही दलांचा ‘इंद्रा २०१९’ या युद्धसरावाची सांगता गुरुवारी पुण्यातील लोहगाव एअरफोर्स स्टेशन येथे झाली. या वेळी दोन्ही देशांच्या वैमानिकांनी कुशलतेने स्वनातित (सुपरसॉनिक) सुखोई ३० विमानांचे उड्डाण करून अनेक युद्धकौशल्याचे आदान-प्रदान केले. या सरावात १० पेक्षा अधिक विमाने सहभागी झाली होते. याबरोबरच पहिल्यांदाच भारतीय वैमानिकाबरोबर एका रशियन वैमानिकाने हे सुखोई ३० विमानांत उड्डाण केले.
भारत आणि रशिया दोन्ही देशांतील संबंध वाढविण्यासाठी तसेच लष्करी तंत्रज्ञान, डावपेच आणि कौशल्य शिकण्यासाठी विविध सरावाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी दोन्ही देशांच्या तिन्ही दलांचा समावेश असलेल्या ‘इंद्रा २०१९’ हा युद्ध सराव ११ डिसेंबरपासून देशातील विविध भागांत सुरू होता. गुरुवारी या युद्धसरावाची सांगता झाली. पुण्यातील सरावात शेवटच्या दिवशी १० सुखोई विमानांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजस, मिराज २०००, जॅग्वार आणि अत्याधुनिक सुखोई ३- या लढाऊ विमानांबरोबर आयएल ७६, एएन-३२ यांसारखी मालवाहू विमानांही सहभाग नोंदविला.
या वेळी पुण्य्याच्या एअर फोर्स स्टेशनचे प्रमुख एअर कमोडोर राहुल भसिन, रशियाच्या हवाई दलाच्या तुकडीचे प्रमुख कर्नल सुरगे बग्रीन, सुखोई ३० स्वॉड्रनचे प्रमुख ग्रुप कॅप्टन प्रोमित बोस, सरावाचे संयोजक टी. जे. सिंग, रशियन हवाई दलाच्या तुकडीचे प्रमुख कर्नल बर्जिन सेरेगे, लेफ्टनंट कर्नल नेस्ट्रेव अॅन्ड्रे उपस्थित होते.या सरावात आम्ही दोन्ही देशांच्या युद्धकौशल्याची माहिती घेतली. संयुक्त राष्ट्राच्या नियमानुसार एखाद्या पिसकिपिंग फोर्सेसमध्ये कारवाई करताना या सरावाचा आम्हाला फायदा होईल.-एअर कमोडोर राहुल भसिन,पुणे एअर फोर्स स्टेशनदोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांना खूप सहकार्य केले. सरवादरम्यान सुखोई ३० आणि अनेक लढाऊ विमानांचे उड्डाण आम्ही केले. तसेच काल्पनिक कारवाया पूर्ण केल्या.- कर्नल सुरगे बग्रीन, रशियाच्या हवाई दलाच्या तुकडीचे प्रमुख