पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या ६ वर्षांत आजी व माजी नगरसेवक-नगरसेविकांच्या वैद्यकीय उपचारांवर ८ कोटी ५९ लाख २१ हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.महापालिकेच्या वतीने आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च केला जातो. त्याचबरोबर शहरी गरीब योजनेंतर्गत अल्पउत्पन्न गटातील नागरिकांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याचा तुलनात्मक आढावा घेणारी ‘नगरसेवकांचे आजार प्रचंड खर्चिक’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांवर ८.५ कोटी रुपये खर्ची पडले असे त्यामध्ये नमूद केले होते. पालिकेच्या वतीने २०१० ते २०१६ या कालावधीमध्ये माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांकरिता ७९ लाख १८ हजार ८५५ रुपये अदा करण्यात आले. आजी व माजी नगरसेवकांसाठी एकूण ८ कोटी ५९ लाख २१ हजार ८६५ रुपये खर्च करण्यात आले असे स्पष्टीकरण महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिले आहे. माहिती अधिकारांतर्गत यानुसार माहिती दिल्याचे उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी स्पष्ट केले आहे.शहरी गरीब योजनेतील ३२ हजार बिलांवर गेल्या सहा वर्षात पालिकेच्या वतीने केवळ ७१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आजी व माजी नगरसेवकांना ६ वर्षात अडीच हजार बिलांची रक्कम पालिकेच्या वतीने अदा करण्यात आली आहे.
नगरसेवकांच्या आजारांवर साडेआठ कोटींचा खर्च
By admin | Published: April 19, 2016 1:27 AM