पुणे : लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षांवर होणारी सुमारतेची टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणातून होणारी आहे,अशा शब्दात नवनिर्वाचित अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवणा-या टीकाकारांचा समाचारघेतला.बडोदा येथे होणा-या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पसरताच देशमुख यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह साहित्य-प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. देशमुखयांची पत्नी अंजली देशमुख यांनी पेढा भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या.माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अक्षयकुमार काळे यांनी आपल्या लेखनातून साहित्यसंपदा समृद्ध केली, असे असतानाही संंमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवण्यात आला, त्याविषयी छेडले असता देशमुख यांनी टीकाकारांनाच लक्ष्य करीत माजी संंमेलनाध्यक्षांची पाठराखण केली. ते म्हणाले, लेखक हा लोकप्रिय नसतो. तो लेखनामधून आपले विचार लोकापर्यंत पोहोचवत असतो. आपल्या परीने तो साहित्यामध्ये स्वत:चे योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र लेखकांचे साहित्य लोक वाचत नाहीत हा दोष त्यांचा नसतो. त्यांची पुस्तक न वाचता केलेली टीका किती मान्य करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे सुमारतेची केली जाणारी टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणाची केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी करणार-मराठी भाषेचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. मराठी भाषा जगवायची असेल तर एका पिढीतून दुस-या पिढीमध्ये मराठीचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. तसेच बृहन्महाराष्ट्र भाषा विभाग स्थापन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.व्यवस्थेविरूद्ध आवाज उठविलाच पाहिजे-संमेलनाध्यक्ष कोणत्याही प्रश्नासंदर्भात व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत, याबद्दल विचारले असता व्यवस्थेविरूद्ध बोलल्यामुळेच प्रशासकीय अधिकारी असताना चारदा बदलीला सामोरे जावे लागले, यातच सगळे आले अशी मिश्किल टीपण्णी देशमुख यांनी केली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. विवेकवादी लोकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. विवेकवादी पद्धतीने चिकित्सा करून आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत. निमंत्रितांनी मानधन घेऊ नये या आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबा साहित्य संमेलनात सहभागी होणा-या निमंत्रितांनी मानधन घेऊ नये असे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे. हा विषय सध्या साहित्यवर्तुळात चांगलाच गाजत आहे. मात्र संमेलन कमी खर्चात व्हावे अशी आयोजकांची भावना आहे. ज्या साहित्यिकांना शक्य आहे त्यांनी आपणहून मानधन नाकारायला हवे असे सांगून देशमुख यांनी आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला.
’’ संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. अर्ज भरल्यापासूनच मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विजयाची आशा होती. माझ्यावर मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याबददल त्यांचा मनापासून आभारी आहे. संमेलनाध्यक्ष हे अत्यंत मानाचे पद आहे. मला माझ्या जबाबदारीचीजाणीव आहे’’- लक्ष्मीकांत देशमुख