- विश्वास मोरे
पिंपरी : पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालकलावंतांचा सन्मान मिळणे ही आनंददायी गोष्ट आहे. पुरस्काराने मी भारावले आहे, आयुष्यात मोठं होऊन यशस्वी अभिनेत्री व्हायचंय, अशी भावोत्कटता बालकलावंत आकांक्षा पिंगळेने शुक्रवारी व्यक्त केली.
राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा शुक्रवारी सायंकाळी झाली. त्यात सुमी या बालचित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुमी फेम आकांक्षा पिंगळे ही पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर येथे वास्तव्यास असून तिचे वडील लक्ष्मण पिंपळे हे एका कंपनीत नोकरीस आहेत तर आई गृहिणी आहे. मुलीला पुरस्कार मिळाल्याने पिंगळे कुटुंब हरखून गेले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पुरस्काराची बातमी कळताच वल्लभनगरात आनंदोत्सव करण्यात आला आहे. तसेच माजी महापौर योगश बहल यांनी घरी जाऊन आकांशाचा सन्मान केला. सातवीनंतरच्या शिक्षणासाठी सुमीचा संघर्ष या चित्रपटातून दाखविला असून या चित्रपटाची निर्मिती हर्षल कामत यांनी केली आहे. तर दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. तर आकांशाने सुमीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कल्याणजवळील शहापूर येथे झाले आहे.
दोन मुलांच्या शिक्षणाच्या संघर्षाची कथा आहे. आकांक्षा आणि देवेश इंदूरकर यांनी उत्तम अभिनय केला आहे. त्या दोघांचे यश आहे. तसेच मला मार्गदर्शन करणाऱ्या अमोल गुप्ते यांनी मार्गदर्शन केल्याने यश मिळू शकले.-अमोल गोळे, दिग्दर्शक
माझ्या चित्रपटास पुरस्कार मिळाला. काय बोलावं कळत नाही. मला अभिनय करणे आवडते. आता शिक्षण सुरू आहे. भविष्यात यशस्वी अभिनेत्री व्हायचे आहे. कलेचे शिक्षण घ्यायचे आहे.-आकांशा पिंगळे, बालकलावंत
सुमी या चित्रपटास राष्ट्रीयपुरस्कार मिळाला. चित्रपटात उत्तम काम केल्याची पुरस्कार ही पावती आहे. मुलीने केलेल्या कष्टाचे चिज झाले. अभिनय हा तिचा आवडता छंद आहे. भविष्यात तिच्या कलागुणांना वाव देणार आहे. -लक्ष्मण पिंगळे, वडील