लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : उन्हाळी हंगामातील पिकांसाठी डिंभे धरणातून पाण्याचे आवर्तन गुरुवारपासून सोडण्यात आले. धरणातून ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ४० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हे आवर्तन उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
कुकडी प्रकल्पातील एक महत्त्वाचे धरण समजल्या जाणाऱ्या डिंभे धरणातून सध्या उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. धरणातून सध्या सुमारे ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाळी आवर्तनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. डाव्या कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी हे जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात सोडण्यात येऊन पुढे ते नगर जिल्ह्यातील आळकुटी, श्रीगोंदा, करमाळा तसेच पारनेर तालुक्यातील बागायती शेतीसाठी दिले जाणार आहे. कर्जतपर्यंत या पाण्याचा शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो. पिंपळगाव जोगा कालवा व मीना शाखा कालव्यांव्दारेही जुन्नर तालुक्यातील बागायती शेतीसाठी हे पाणी उपयोगात येणार आहे.
उजव्या कालव्याव्दारे जाणारे पाणी हे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती शेती सिंचनाबरोबरच शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या आवर्तनाचा फायदा लाभक्षेत्रातील मका, कडवळ, बाजरी, भुईमूग व भाजीपाला तसेच ऊस व इतर बागायती पिकांना होणार आहे. शेतकऱ्यांनी या आवर्तनाचा योग्य पध्दतीने लाभ घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
फोटो ओळ : डिंभे धरणातून उन्हाळी आवर्तन गुरुवारपासून सोडण्यास सुरुवात झाली. धरण्याच्या कालव्याद्वारे ६०० क्युसेक वेगाने हे आवर्तन सोडण्यात येत आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी)