शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या समितीच्या माध्यमातून हक्काचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. तसेच, आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती समितीचे समन्वयक समाधान डोके यांनी दिली.
चासकमानच्या पाण्यावर शिरूर तालुक्यातील तब्बल ५० टक्के सिंचन अवलंबून आहे. यावर्षीचे पाटबंधारे विभागाने १० मार्चला ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू केले. ‘टेल टू हेड’ पध्दतीने हे आवर्तन शिरूरच्या २० गावांना २५ एप्रिलला देण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. ४५ दिवसाचे ५७ वा दिवस उजाडला, तरी या भागाला पाणी दिले गेले नाही. त्यामुळे बहुतांश भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी पिके करपून चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतभेद विसरून काही मंडळी एकत्रित येत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केल्याची माहिती जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांनी दिली.
शिक्रापूरमध्ये या समितीची बैठक पार पडली यावेळी जातेगावचे उपसरपंच गणेश उमाप, गणेश मासळकर, बाळासाहेब चव्हाण, अविनाश देवकर, प्रवीण मासळकर, समीर मासळकर, महेश मासळकर, पांडुरंग ढोकले, नितीन दरेकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत कालवा क्षमता नसताना अनिर्बंध पाणी पूर्व भागात देण्याचा सातत्याने होणारा हट्ट, ९२ ते १४४ किलोमीटरच्या पाण्याचे आवर्तन दिवस कधीच निश्चित केले जात नाही, आवर्तनाच्या बैठका, तारखा, वितरणाची पध्दती कधीच जाहीर केली जात नाही, सदोष कालवे-पाट असल्याने ४५ टक्के पाणी गळती असल्याचे खात्याला मान्य आहे. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही केली जात नाही, हेड टू टेल की, टेल टू हेड ही पध्दती सोयीस्कर बदलली जाते, प्रकल्पासाठी पुनर्वसन व भूसंपादन शिक्रापूर परिसरात असताना या भागावरच सतत अन्याय, पाणीपुरवठा सोसायट्यांना २३ दिवसांच्या फरकाने पाणी देण्याच्या नियमाची थेट पायमल्ली,पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत पूर्व भागाकडे थेट दुर्लक्ष, मेन पाटावरील अनेक पोटचाऱ्यांना रात्रीचे पाणी सर्रास दिले जाते, आवर्तन वेळेत नसल्याने पिकांच्या नुकसानभरपाईची जबाबदारी खात्याची आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आता या प्रश्नाची सोडवणुकीसाठी न्यायालयाकडे दाद मागण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर यासंदर्भात आंदोलनही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
१० शिक्रापूर
जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथील लक्ष्मण नरके यांनी पाणी आवर्तन वेळेत न आल्याने सोडून दिलेले दीड एकर वांग्याचे पीक.