पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदीकाठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान उपलब्ध होत असल्याने बाजरीचे पीक जोरदार येऊन, उत्पादनही मोठे मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात.
भामाआसखेड धरणातील पाणी नदीपात्रातून पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येते. यामुळे नदीकिनाऱ्यावरील शेतकरी विविध पिके घेत असतात. चाकण, खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्याप्रमाणे अनेक शेतकरी आपला तरकारी माल मुंबईलाही पाठवत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
उन्हाळी बाजरी पेरणी केल्यानंतर खुरपणी, खतपाणी व तिची पक्षांपासून निगा राखावी लागत असते. पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्याने यंदा बाजरीचे पीक जोरदार आले आहे. बाजरीची कणसे मोठी असून, दाणेही टपोरे आहेत. त्यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ बाजरीची पेरणी केली होती. त्यामुळे या वर्षी बाजरीचे उत्पादन चांगले येणार असल्याचे शिंदे गाव येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शिंदे गाव येथील शेतकरी सुनील देवकर यांच्या शेतातील उन्हाळी बाजरीचे जोमदार पीक.