आंबेगाव तालुक्यात घोडनदी व डिंभा उजवा कालवा, डावा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने शेतकरी वर्षाला ३ ते ४ नगदी पिके घेत असतात. मागीलवर्षी कांद्याला एका क्विंटलला ७००० ते ८००० रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, देवगाव, काठापूर, लाखणगाव, शिंगवे, जारकरवाडी, आदी गावातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी महागड्या भावाने कांदा रोपे घेऊन लागवड केली. मात्र मार्च महिन्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर आदी भागात उन्हाळा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात १० किलो कांद्याला ४०० ते ५०० रुपये इतका बाजारभाव मिळत होता. सध्या मात्र कांद्याचे भाव गडगडल्याने १० किलो कांद्याला १२० ते १३० रुपये इतका कमी बाजारभाव मिळत आहे. कांदा लागवड मजुरी, काढणीचा खर्च, खते-औषधे इत्यादीसाठी केलेला खर्चसुद्धा सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी शेताच्या कडेला कांदा आरण करून ठेवल्याचे पहावयास मिळत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लहू किसान चवरे यांच्या शेतात उन्हाळा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र कमी बाजारभाव मिळत असल्याने कांदा आरण करून ठेवला आहे.