-------------------
उन्हाळा वाढला आणि त्या प्रमाणात पाणी कमी पिण्यात आलं की, बऱ्याच व्यक्तींना , विशेषतः स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. म्हणूनच त्याला उन्हाळी लागणे असे म्हणत असावेत. शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी सलग ५-६ तास बसावं लागतं. दुपारी निवांत खरेदी करण्यासाठी बाजारात बरंच हिंडले, ऊन लागलं आणि जळती लागली अशी स्त्रियांची तक्रार असते. सार्वजनिक शौचालयाचा वापर केला आणि त्रास सुरू झाला हा एक कॉमन गैरसमज आहे. उलट खूप वेळ लघवी रोखून धरली तर त्रास होऊ शकतो. अनेक व्यक्तींना ही जळजळ दुपारनंतर, संध्याकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणात सुरू होते, कारण दुपारच्या जेवणानंतर पाणी कमी प्रमाणात प्याले जाते. जळजळ होण्याचा त्रास सुरू झाल्यास भरपूर पाणी प्यावे. लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी प्यायल्याने लघवीची pH अल्कलाईन होते आणि irritation कमी होते. पूर्वी आजी धण्या -जिऱ्याचं पाणी प्यायला द्यायच्या. बाजारात अशी अनेक अल्कलाईन औषधे उपलब्ध आहेत. पण पाण्यासारखे स्वस्त आणि मस्त औषध नाही. काही मंडळी स्वतःच्या मनाने किंवा गूगल सर्च करून अॅंटिबायोटिकच्या दोन चार गोळ्या घेतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते. पण हे अतिशय चुकीचे आहे. लघवी तपासून त्यात जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविके सुरू करावीत. कारण ५० टक्के लोकांना ही जळजळ concentrated Urine मुळे होते आणि त्याला अॅन्टिबायोटिकची गरज नसते. जंतुसंसर्ग असल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. संपूर्ण कोर्स झाल्यानंतर देखील वारंवार त्रास झाल्यास युरीन कल्चर, सोनोग्राफी, किडनी फंक्शन टेस्टस् इत्यादी तपासण्या कराव्या लागतात. काही वेळा जंतुसंसर्ग जास्त असल्यास लघवीतून रक्त पडते. अशावेळी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुतखडा नाही ना हे बघण्याकरिता सोनोग्राफी करणे आवश्यक असते.लघवीची जळजळ होणे हा आजार बहुतांश वेळा किरकोळ समजला जातो.थोडे बरे वाटले की औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही , पण हे फार धोकादायक आहे. कारण हा जंतुसंसर्ग किडनी पर्यंत पोचला तर धोकादायक ठरू शकतो. पायोनेफ्रोसिस आणि किडनी फेल्युअर होऊ शकते. स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत लघवी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अंगावर कोणत्याही कारणाने पांढरे जात असेल तरीही जळजळ होऊ शकते. मेनोपॉझ नंतर , गर्भाशय काढल्या नंतर हे त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतात.लहान मुलांना कृमी असल्यास हा त्रास होतो. फायमोसिस किंवा युरेटेरिक व्हॉल्व नाहीत ना, हे तपासून बघणे जरूरीचे आहे.पुरुषांना पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढून लघवी तुंबल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे लघवीला जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाणी प्यायला विसरू नका.
- डॅा. माया तुळपुळे, जनरल सर्जन, माजी अध्यक्ष आयएमए