मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:10 AM2022-06-09T11:10:21+5:302022-06-09T11:12:09+5:30
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचा समन्स
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ राेजी हिंसाचार, जाळपोळ आदी घटना घडल्या. यामध्ये काही नागरिकांचा जीव, तसेच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, या हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) आदी प्रमुख पक्षांच्या अध्यक्ष अथवा प्रमुखांना बुधवारी (दि. ८) समन्स बजावण्यात आले आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी दिली.
कोरेगाव भीमा घटनेबाबत चौकशी करण्यासाठी शासनाने कलकत्ता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आहे. या आयोगास शासनाने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. कोरोना महामारीमुळे त्यात पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास व शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथिगृह, तसेच पुण्यातील जुन्या जिल्हा परिषद येथे या सुनावण्या होणार आहेत.
राज्यातील या सहा पक्षांना समन्स
१) उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
२) नाना पटोले, अध्यक्ष, काँग्रेस
३) चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
४) राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) ॲड. बाळासाहेब आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
६) रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)
आदी पक्षांच्या प्रमुखांना येत्या ३० जूनपर्यंत आयोगासमोर येऊन आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे.