पुणे/नागपूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. पुढील २४ तासांत उष्णतेची लाट कायम राहून दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ गेल्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात घट झाली होती़ आता पुन्हा पारा चाळीशीकडे वेगाने जाऊ लागला आहे़ उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान वाढत असताना किमान तापमानात मात्र घट होताना दिसत आहे़ राज्यातील किमान १५ मोठ्या शहरातील पारा चाळीसपेक्षा अधिक होता़ सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून कडाक्याच्या उन्हाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील श्रीरामनगर, गजशहेदा येथे राजेंद्र चरपे (४७) या मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्याला मालकाने परतवाडा येथील श्रीरामनगरातील खुला भूखंड साफ करण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पाठविले. रात्री जेवण केले नसल्याने काम करीत असताना भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. लोकांना निदर्शनास येताच त्यांनी परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३ अंश तर आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश नोंदविले गेले़ प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़७, अहमदनगर ४०़२, जळगाव ३८़८, कोल्हापूर ३८़६़, महाबळेश्वर ३४़५, मालेगाव ४०, नाशिक ३८़१, सांगली ४०़१, सातारा ३९़१, सोलापूर ४१़५़, मुंबई ३२, अलिबाग ३१़७, रत्नागिरी ३३, वेंगुर्ला ३५़१, डहाणू ३२़२, भिरा ४१, उस्मानाबाद ३९़६, औरंगाबाद ३८, परभणी ४०़९, अकोला ४०़५, अमरावती ४०़२, ब्रम्हपुरी ४३़, चंद्रपूर ४२़२, गोंदिया ४१़६, नागपूर ४२़७, वाशिम ३९़२, वर्धा ४२, यवतमाळ ४०़५़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारायेत्या २४ तासांत उत्तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राने वर्तविली आहे. अशावेळी गहू पीक काढणीस विलंब केल्यास उत्पादन घटते. त्यामुळे गहू पिकाची काढणी त्वरित करावी, तसेच फळबाग व भाजीपाला पिकांना वारंवार हलके ओलीत करावा, असा सल्लाही दिला आहे.
ऊन्हाचा कडाका कायम
By admin | Published: April 09, 2017 12:15 AM