- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : धर्मगुरुंचे महत्व धर्मस्थळांपुरतेच मर्यादित असले पाहिजे. धर्मगुरुंपेक्षाही कायदे महत्वाचे आहेत. सामान्यांनी आपले जाती-धर्म घरात खुंटीला टांगून माणूस म्हणून घराबाहेर पडावे. कारण, कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ आहे. समता आणि बुध्दिप्रामाण्यवाद कायमच महत्वाचा आहे. धर्म ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. माणूस जगला तरच धर्म वाचेल. तरुणांनी मातृभूमीच्या आणि महिलांच्या न्यायासाठी लढले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी व्यक्त केली. ‘दगडावरची पेरणी’ या आत्मचरित्राचा आसामी भाषेत अनुवाद झाला असून, आता बंगाली अनुवादाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे यंदाचा जीवनगौैरव पुरस्कार सय्यदभाई यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद.--------------* लहानपणीचे दिवस कसे होते?- मी कुटुंबासह रेंज हिल्स परिसरात रहायला होतो. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. चौथीपर्यंत शिक्षण मोफत असल्याने शाळेत जाता आले. त्यानंतर मात्र शाळा सुटली ती कायमचीच. त्यावेळी मी तात्यासाहेब मराठे यांच्या प्रेसमध्ये कामाला लागलो. तात्यासाहेब स्वातंत्र्यसैनिक होते. नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी यांच्यासह ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्याच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या. त्यातूनच मी घडत गेलो, राष्ट्रप्रेमाचे संस्कार मनात रुजत गेले. तात्यासाहेबांच्या पश्चात वहिनी कमलताई मराठे यांनीही कायम प्रेमळ वागणूक दिली. बिनभिंतीच्या शाळेने मला जीवनाचे धडे दिले. आईने मातृभूमीप्रेमाचे संस्कार केले.* मुस्लिम सत्यशोधक चळवळीशी कसे जोडले गेलात?- माझ्या बहिणीचे सोळाव्या वर्षीच लग्न झाले. अठराव्या वर्षी तिच्या पतीने तिला तलाक दिला आणि दुसरे लग्न केले. बहिणीला दोन मुले होती. त्यांची जबाबदारीही बहिणीवर होती. जुनी झाली म्हणून टाकून द्यायला आणि आवडली म्हणून नवीन घ्यायला पत्नी म्हणजे भाजीपाला आहे का, असा प्रश्न मी बहिणीच्या पतीला आणि मौलवींना विचारला. बहिणीच्या तलाकचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तिथूनच अन्यायाविरोधातील लढ्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली. * हमीद दलवाई यांच्याशी कशी भेट झाली?- सर्वधर्म सलोखा जपला जावा, यासाठी आम्ही तरुणांनी राष्ट्रीय एकात्मता समितीची स्थापना केली. या माध्यमातून भाई वैद्य, बाबा आढाव, यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या व्यक्तींशी संपर्क आला. युक्रांदतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे हमीद दलवाई यांच्या तीनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मानवी मुल्यांना महत्व देणारे त्यांचे विचार मनाला पटले. तलाकविरोधातील विषय डोक्यात पक्का बसला होता. दलवार्इंना भेटण्याची इच्छा भार्इंना बोलून दाखवली. दोन दिवसांनी भार्इंच्या घरी हमीद दलवाई यांना भेटलो. त्यांचा मनमिळावू स्वभाव, साधी राहणी आणि उच्च विचार मनाला भावले. बहिणीप्रमाणे इतरांवर अन्याय होऊ नये, यासाठी काम करण्याची इच्छा त्यांना बोलून दाखवली. तू माझ्याबरोबर काम कर, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी कधीच त्यांचा पिच्छा सोडला नाही.* मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कशी झाली?- अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आपण संघटना का उभी करु नये, असा प्रश्न मी हमीदभार्इंना विचारला. भार्इंच्या घरी पुण्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बैठका होत असत. वर्षभर चर्चा, विचारमंथन झाले. २२ मार्च १९७० रोजी आंतरभारतीच्या सभागृहामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. सामान्य लोकांनी खूप विरोध केला, टीका केली. या प्रवासात लढवय्ये आणि विचारवंत हमीदभाई यांचा सहवास लाभल्याने कार्याला योग्य दिशा मिळाली. १९७१ मध्ये आम्ही पहिली मुस्लिम महिला परिषद आयोजित केली. हमीदभार्इंच्या पश्चातही हा लढा सुरु ठेवण्याचा वसा घेतला.* तिहेरी तलाकविरोधातील कायदा मंजूर झाल्याने परिस्थिती सुधारेल, असे वाटते का?- कायदा आणि नियम कायमच चुकीच्या गोष्टींवर वचक बसवणारे असतात. मात्र, कायद्याप्रमाणेच समाजाची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे. माणसे मनाने, विचाराने बदलली पाहिजेत. समाजाची नितिमत्ता जागृत झाली पाहिजे. समतेवर आधारित समान नागरी कायद्याची मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत. महिलेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवाच. * सामान्य लोकांवर आजही धर्माचा, धर्मगुरुंचा पगडा आहे. त्यांच्या मनात सुधारणेची बीजे कशी पेरता येतील?- धर्मगुरुंचे महत्व केवळ धर्मस्थळांपुरतेच मर्यादित असले पाहिजे. धर्मगुरुंपेक्षाही कायदे महत्वाचे आहेत. सामान्यांनी आपले जाती-धर्म घरात खुंटीला टांगून माणूस म्हणून घराबाहेर पडावे. कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ आहे. जातीधर्मावर माणसाची किंमत ठरवली जाऊ नये. घराबाहेर आपण कोणत्याही धर्माचे नसून, भारतीय नागरिक आहोत याचा विसर पडता कामा नये. स्वर्ग किंवा नरकासारख्या संकल्पनांचा विचार करण्यापेक्षा जमिनीवर आपल्या भवताली काय चालले आहे आणि त्यात आपण काय सुधारणा घडवू शकतो, याचा विचार प्रत्येक सुज्ञ माणसाने केला पाहिजे.
रविवार मुलाखत- माणूस जगला तरच धर्म वाचेल.. : सय्यदभाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 7:00 AM
तरुणांनी मातृभूमीच्या आणि महिलांच्या न्यायासाठी लढले पाहिजे..
ठळक मुद्दे चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौैरव पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त संवाद