पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असून अदयापही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झालेले नाही. त्यामुळे उमेदवारांचा गाठी भेटीवर अधिक भर आहे. त्यात पुण्यातील तळजाई टेकडीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची अचानक भेट झाली. प्रचारादरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावरुन सुसंस्कृत राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
लोकसभा निवडणुकीचा सामना रंगु लागला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ एप्रिल तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल पासुन उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा जाहीर प्रचारापेक्षा गाठीभेटीवर अधिक भर आहे. तळजाई टेकडी येथे रोज हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात. रविवारी तर येथे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे तळजाई टेकडीवर प्रचारासाठी आले होते. येथे या दोन्ही उमेदवारांची अचानक भेट झाली. प्रचार दरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांशी संवाद साधला आणि शुभेच्छाही दिल्या. यावेळी आमदार भीमराव तापकीर, उल्हास पवार, दत्ता धनकवडे, आप्पा रेणुसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.