बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:16 AM2024-02-18T10:16:07+5:302024-02-18T10:16:35+5:30

बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा मुकाबला पाहायला मिळणार

Sunetra Pawar vs Supriya Sule in Baramati loksabha election | बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा मुकाबला पाहायला मिळणार, अशी चर्चा सुरू झाली असून, ही लढाई केवळ दोघींची राहणार नाही तर पवार विरुद्ध पवार असा अस्मितेचा सामना रंगू शकतो. मात्र, सुप्रिया सुळे यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुळे यांनी मतदार संघात लक्ष केंद्रित करत भेटीगाठी सुरू केल्या.

महत्त्वाचे म्हणजे, महिलांकडे अधिक लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी हळदी-कुंकू समारंभ, अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम यांसह अन्य कार्यक्रम घेतले. इतकेच नाही तर त्यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्या थोपटेंना घरी जाऊन भेटल्याने संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली. दुसरीकडे अजित पवार गटाकडे उमेदवार नाही, असे वारंवार बोलले जात होते. जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांना बारामती लोकसभा मतदार संघाचा अहवाल दिला. त्यात बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील तरच खा. सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून अजित पवारांवर दबावतंत्र वापरण्यात येत होते. अखेर गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. तसे बॅनरही काही ठिकाणी झळकले आहेत.

आमदार कुल कुटुंबीयांची भेट

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी सुनेत्रा पवार थेट रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनीही हळदी- कुंकूसारखे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यासाठी संपूर्ण मतदार संघात चित्ररथ फिरवले जात आहेत. दौंडमध्ये जाऊन आमदार राहुल कुल कुटुंबीयांची देखील त्यांनी भेट घेतली आहे.

वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर...

■ अजित पवार यांनी नुकतीच लोकांना भावनिक साद घातली आहे. परिवार सोडला तर सगळे कुटुंबीय विरोधात आहेत, वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्ष झालो असतो, पक्ष ताब्यात आला असता, पण तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटी जन्मलो ना, अशा शब्दात अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. अजित पवारच नव्हे तर सुनेत्रा पवार यांनीही गाठीभेटी दरम्यान, आतापर्यंत साथ दिली, तशीच पुढेही साथ राहू द्या, असे आवाहन ते करत आहेत.

लोकशाहीत कुणीही विरोधात उभे राहु शकतात

■ शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी केलेल्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले. पण त्यांनीही निर्णय बारामतीकरांवर सोडून दिला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशा- हीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही.

 

Web Title: Sunetra Pawar vs Supriya Sule in Baramati loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.