Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:20 IST2024-11-26T13:18:34+5:302024-11-26T13:20:19+5:30
सुनील शेळके यांनी ऐतिहासिक अशा १ लाख ८ हजार ५६५ इतक्या फरकाने मावळात विजय मिळविला

Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड
पिंपरी : मावळ मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुनील शेळके यांना शहरी भागातून जास्त मताधिक्य मिळाले आहे. सर्वाधिक मताधिक्य तळेगाव दाभाडे येथून १३ हजार ९५७, तर देहूरोडमधून ६ हजार ४४३ मतांची आघाडी मिळाली आहे. तसेच लोणावळा, देहूगाव, वडगाव या शहरांतूनही सुनील शेळके यांनीच आघाडी मारली आहे.
विधानसभेच्या मतमोजणीत सुनील शेळके यांना एकूण १ लाख ९१ हजार २५५ मते मिळाली. तर प्रमुख विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना ८२ हजार ६९० मते मिळाली. तर ‘नोटा’ या पर्यायाला तिसऱ्या क्रमांकाची २७१५ इतकी मते मिळाली आहेत. सुनील शेळके यांनी ऐतिहासिक अशा १ लाख ८ हजार ५६५ इतक्या फरकाने विजय मिळविला आहे.
केंद्रनिहाय सरासरी तीनशेचे ‘लीड’...
मतदारसंघात ४०३ बूथ होते. दोन-तीन बूथ मिळून एक मतदान केंद्र करण्यात आले. या सर्व मतदान केंद्रांवर सुनील शेळके यांना आघाडी आहे. बूथनिहाय शेळके यांनी भेगडे यांच्यापेक्षा सरासरी तीनशे मतांची आघाडी घेतली आहे. पोस्टल मतांमध्येही सुनील शेळके यांनी ५२४ मते घेतली, तर बापूसाहेब भेगडे यांना २३५ मते मिळाली आहे. पोस्टल मतामध्येही २८९ मतांची शेळके यांनी आघाडी घेतली. तर पोस्टलमध्ये नोटाला ११ मते आहेत.
शहरी भागातही सरशी...
सुनील शेळके यांनी शहरी भागातूनही सरशी मिळाली आहे. यामध्ये सरासरी पाच हजारांचे मताधिक्य शेळके यांनी घेतले आहे. तर बापूसाहेब भेगडे यांना तळेगाव, वडगावमधूनही पिछाडीवर राहावे लागले आहे.
असे मिळाले मताधिक्य...
शहर सुनील शेळके बापूसाहेब भेगडे मताधिक्य
तळेगाव दाभाडे ४१२९९ २७३४२ १३,९५७
देहूरोड १९७२६ १३२८३ ६४४३
देहूगाव १५१०६ १०१०४ ५००२
लोणावळा १३९७५ १०३६९ ३६०६
वडगाव १२०९१ ८६९१ ३४००