Maval Assembly Election 2024 result: मावळात अजित पवार गटाचे सुनील शेळके ५ हजार मतांनी आघाडीवर; भेगडे पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:06 AM2024-11-23T09:06:02+5:302024-11-23T09:06:16+5:30
Maval Assembly Election 2024 result: बापू भेगडे अपक्ष उमेदवार असून महविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे
पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे सुनील शेळके ३२९१ मतांनी आघाडीवर तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे २१०८ मतं मिळाली आहेत. तर शेळके यांना ५३९९ मतं मिळाली आहेत. यंदा सुनील शेळके यांच्या विरोधात मावळचे सर्व पदाधिकारी उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीने सुद्धा या मतदार संघात उमेदवार न देता शेळके याना पाठिंबा दिला आहे. आता हे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लाख लागून आहे.
मावळ मतदारसंघात २०१९ ला ७१.१० टक्के, तर यावेळी ७२.५९ टक्के मतदान झाले. जास्तीच्या मतदानाचा फायदा दोन्ही उमेदवार आपल्यालाच होणार असल्याचे सांगत आहेत. वाढलेले मतदान हे विद्यमानांच्या विरोधात जाते, असा इतिहास असला तरी यावेळी वाढलेला दीड टक्का महायुतीच्या सुनील शेळके यांना आघाडी मिळवून देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच वेळी अपक्षाला पाठिंब्याचा ‘मावळ पॅटर्न’ यंदा यशस्वी होईलच, असाही सूर आहे.
महायुतीचे शेळके आणि अपक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर लावण्याची आणि मिरवणुका काढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रचारात दोन्ही उमेदवारांची आघाडी होती. यावेळेस मागीलवेळपेक्षा दीड टक्के मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे या मतदारांनी कोणाला कौल दिला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
विकासकामे, गुंडगिरी यावर प्रचारात भर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेळके आणि अपक्ष भेगडे यांच्यात लढत असताना दोघांनी प्रचारात एकमेकांवर टीका केली होती. शेळके पाच वर्षांतील विकासकामांचा दाखला देत पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत होते, तर भेगडे यांनी मतदारसंघातील गुंडगिरी, अर्धवट विकासकामे आदी मुद्दे मांडत प्रचार केला. त्यांना मावळातील सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याने लढतीत रंगत आली. मात्र, शहरी आणि मूळ भाजपच्या मतदारांचा कौल शेळके यांना, तर ग्रामीण मतदारांचा कौल भेगडे यांना असल्याचे चित्र आहे.
दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचेच
दोघे उमेदवार एकाच पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीत होते. ते जुने मित्रही आहेत. मात्र, एकमेकांवर प्रखर टीका करत त्यांनी वैयक्तिक उणीदुणीही काढली. त्याचबरोबर गावकी-भावकी, मावळातील गुंडगिरी, विकासकामे आदी मुद्दे प्रचारात प्रमुख होते. त्याचा प्रभाव मतदारांवर किती पडला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.